सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी सतर्कता हाच खरा उपाय- डीवायएसपी भातलवंडें

0
सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी सतर्कता हाच खरा उपाय- डीवायएसपी भातलवंडें

उदगीर (एल पी उगिले) आजच्या डिजिटल युगात सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. विद्यार्थ्यांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे यांनी केले, लातूर जिल्हा पोलीस प्रशासन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित सायबर सुरक्षा जागरूकता सत्रात ते बोलत होते. या वेळी गजानन भातलवंडे यांनी मोबाईल ॲप्स, ओटीपी, आंतरराष्ट्रीय कॉल्स तसेच डिजिटल अरेस्टसारख्या फसवणुकीच्या प्रकारांबाबत सविस्तर माहिती दिली. अनोळखी लिंक किंवा ॲप्सवर विश्वास ठेवू नये, केवळ अधिकृत स्त्रोतांमधूनच ॲप्स डाउनलोड करावेत व अनावश्यक परवानग्या देऊ नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले. ओटीपी हा वैयक्तिक पासवर्ड असल्याने तो कोणालाही देऊ नये, बँक अधिकारी किंवा पोलिस असल्याचे सांगून मागितला तरीही ओटीपी शेअर करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच आंतरराष्ट्रीय किंवा संशयास्पद कॉल्स टाळावेत, कॉल फॉरवर्डिंग सुविधा बंद ठेवावी आणि कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक झाल्यास त्वरित हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा प्रत्यक्षात अवलंब करून स्वतःसह कुटुंबाचेही सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करावे, असे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी केले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ.आर.के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राजकुमार पुजारी आणि सुधाकर केंद्रे, महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!