मराठी शाळांच्या* *संरक्षणासाठी शिवसंग्राम संघटनेतर्फे आ. शरणू सलगर यांचा जाहीर निषेध

0
मराठी शाळांच्या* *संरक्षणासाठी शिवसंग्राम संघटनेतर्फे आ. शरणू सलगर यांचा जाहीर निषेध

उदगीर (एल पी उगिले): कर्नाटक राज्यातील सीमा भागात असलेल्या मराठी शाळा बंद करण्याचा निर्णयाच्या संदर्भात बेळगाव येथे पार पडलेल्या २०२५ च्या हिवाळी अधिवेशनात मागणी करणारे वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर यांच्याविरोधात शिवसंग्राम संघटनेच्या वतीने बुधवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी बसवकल्याण येथे भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे बसवकल्याणचे तहसीलदार यांच्यामार्फत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या, विधानसभा सभापती, शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा तसेच शिक्षण उपायुक्त, बिदर यांना निवेदन सादर करून आमदार शरणू सलगर यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
शिवसंग्राम संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०२५ च्या बेळगाव हिवाळी अधिवेशनात आमदार शरणू सलगर यांनी “मराठी शाळा बंद कराव्यात” असे केलेले विधान अत्यंत दुर्दैवी, अपमानजनक व मराठी भाषिकांच्या भावना दुखावणारे आहे. बसवकल्याण हा सीमावर्ती तालुका असून येथे मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक जनता वास्तव्यास आहे. अशा परिस्थितीत मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याची मागणी करणे म्हणजे सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर घाला घालण्यासारखे असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, मराठी शाळा बंद करण्याऐवजी त्यांना संरक्षण देणे, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि शाळांचा दर्जा उंचावणे, ही शासनाची जबाबदारी आहे. सीमावर्ती भागात कन्नड माध्यमाच्या शाळांबरोबरच मराठी माध्यमाच्या शाळाही तितक्याच आवश्यक असून, दोन्ही भाषांचा सन्मान राखणे ही लोकशाही मूल्यांची गरज असल्याचे शिवसंग्राम संघटनेने ठामपणे मांडले.
मोटारसायकल रॅलीदरम्यान आंदोलकांनी “मराठी शाळा वाचल्या पाहिजेत”, “सीमाभागातील मराठी शिक्षणाला न्याय द्या”, “मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही” अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आ. सलगर यांनी मराठी शाळांऐवजी केवळ कन्नड माध्यमाच्या शाळा ठेवाव्यात, असे केलेल्या विधानामुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
यावेळी वक्त्यांनी आ. शरणू सलगर यांना थेट इशारा देत सांगितले की, मराठी शाळा बंद करण्याबाबत केलेले विधान त्यांनी तात्काळ मागे घ्यावे. अन्यथा मराठी भाषिक जनतेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल, आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांवर राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
वक्त्यांनी पुढे सांगितले की, मराठी शाळांमध्ये कन्नड भाषा ही द्वितीय भाषा म्हणून शिकवली जाते. बेळगाव, बिदर, औराद, भालकी, बसवकल्याण, कमलनगर आदी भागांतील सुमारे ८६५ गावांमधील मराठी भाषिक विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन आज शासकीय, निमशासकीय, सॉफ्टवेअर इंजिनिअर तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यामुळे मराठी शाळा बंद करण्याचे विधान म्हणजे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालणारे असल्याचे आंदोलकांनी ठामपणे नमूद केले.
या मोर्चाचे नेतृत्व बिदर जिल्हा शिवसंग्रामचे अध्यक्ष संदीप तेलगावकर आणि बसवकल्याण तालुका शिवसंग्रामचे अध्यक्ष संतोष बिरादार यांनी केले.
यावेळी संभाजी जगताप, सदानंद बिरादार, सचिन खेळगे, वेंकटेश दत्ता, संतोष गायकवाड, सुरेश पाटील, विक्रम पाटील, संदीप बिरादार, बालाजी पाटील, विजयकुमार पाटील, सतीश कटारे यांच्यासह बसवकल्याण परिसरातील मोठ्या संख्येने मराठी भाषिक नागरिक उपस्थित होते.
शिवसंग्राम संघटनेने शेवटी स्पष्ट इशारा दिला की मराठी भाषा, संस्कृती व शिक्षणावर होणारा कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही. मराठी शाळांच्या संरक्षणासाठी व मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी भविष्यातही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!