डॉ. दीपक सोमवंशी निडेबन जि.प. गटातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक
उदगीर (एल पी उगीले): नुकत्याच होऊ घातलेल्या स्थानीक स्वराज्य संस्था निवडणुकीतील प्रक्रिया चालू असून आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार असल्याने अनेकजण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागले आहेत. शहरालगत असलेला निडेबन हा जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती ( सर्वसाधारण ) साठी राखीव असल्याने निडेबनचे भूमिपुत्र, उदगीर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ तथा महात्मा बसवेश्वर चॅरिटेबल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. दीपक सोमवंशी ही निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. ते निडेबनचे भूमिपुत्र असल्याने त्यांना ही निवडणूक जिंकणे सुलभ होईल, असे लोकांतून बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकांच्या आग्रहास्तव ते या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
डॉ. दीपक सोमवंशी यांचा जन्म निडेबन येथे सामान्य कुटुंबात झाला.अतिशय हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली. परंतु आपण ज्या परिसरात वाढलो, घडलो त्या परिसरातील लोकांची सेवा करता यावी, या उदात्त हेतूने त्यांनी 2009 मध्ये उदगीर येथे महात्मा बसवेश्वर चॅरिटेबल हॉस्पिटलची सुरुवात केली, या माध्यमातून त्यांनी लोकांची सेवा सुरू केली. अल्पवधीतच नावलौकिक कमावलेल्या डॉ. दीपक सोमवंशी यांनी माफक दरात रुग्णसेवा सुरु केली. शिवाय उदगीर परिसरातील अनेकांना मदतीचा हात दिला.
निडेबन या गावात सर्वांच्या सुखदुःखात ते सहभागी होत असतात. वैद्यकीय सेवेशिवाय त्यांनी सामाजिक कार्यातही हिरीरीने सहभाग नोंदवला आहे. कुठलेही सामाजिक कार्य असो त्यांच्याकडे सहकार्यासाठी येणाऱ्या अनेकांना त्यांनी सहकार्य करीत प्रोत्साहन दिले. अनेकांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली, अनेकांना व्यवसायासाठी मदत केली, अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनविणे यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. माणसे जोडणे आणि ती जपने हे त्यांचे खास वैशिष्ट्ये आहे. आपल्या वैद्यकीय सेवेतूनही ते अनेकांना वेळ उपलब्ध करून देतात. त्यामुळे अनेकजण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेवून आपले कार्य करीत असतात. प्रत्येक क्षेत्रात आपली माणसे असावीत हा त्यांचा हेतू. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकजण वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावलेले आहेत. आपल्या वैद्यकीय सेवेतून दररोज कार्यकर्त्यांना ते वेळ देत असतात. त्यांच्या वैद्यकीय, सामाजिक कार्याची पद्धत पाहून त्यांनी राजकारणात यावे, जेणेकरून अनेकांची कामे होतील. या हेतूने लोकं त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात येण्यासाठी आग्रह करीत होते. नुकतेच निडेबन जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव सुटल्याने कार्यकर्ते त्यांना ही निवडणूक लढवण्यासाठी आग्रह करीत असून यावेळी त्यांनी ही निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले असून ग्रामीण भागातून त्यांना लोकांचा निवडणूक लढविण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे.
