श्रीधर सावळे यांचा दर्पण रत्न पुरस्काराने गौरव

0
श्रीधर सावळे यांचा दर्पण रत्न पुरस्काराने गौरव

उदगीर (प्रतिनिधी)
मराठी पत्रकार दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दर्पण रत्न पुरस्कार २०२६ कार्यक्रमात श्रीधर सावळे यांना मलकापूर येथे राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जनता पोलिस टाईम्स या यूट्यूब चॅनल व न्यूज पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या निर्भीड, वस्तुनिष्ठ व समाजाभिमुख पत्रकारितेची दखल घेत हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ ९००१ : २०१५ प्रमाणित हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त ९८० प्रस्तावांपैकी निवड करून २४० मान्यवरांना दर्पण रत्न पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेश तायडे (सहाय्यक माहिती आयुक्त, मंत्रालय, मुंबई) हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रा. अनिल खर्चे (प्राचार्य, व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेज) यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून अशांतभाई वानखेडे (संस्थापक – समतेचे निळे वादळ), धनश्रीताई काटीकर पाटील (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, हिंदी मराठी पत्रकार संघ), बंडूभाऊ चवरे, बाळासाहेब दामोदर (उद्योजक), दामोदर शर्मा (शेतकरी नेते), विजय डागा, बंडू चौधरी, सुभेदार दिनेश तायडे (कारगिल योद्धा), चंद्रकांत वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. यावेळी पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक, राजकीय, कला, वैद्यकीय, उद्योजक, क्रीडा आदी विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा दर्पण रत्न पुरस्कार २०२६ देऊन सन्मान करण्यात आला. देशसेवेसाठी अतुलनीय योगदान देणारे व कारगिल युद्धात सहभागी असलेले माजी सैनिक सुभेदार दिनेश तायडे यांचा विशेष स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी मानले.
या राज्यस्तरीय सन्मानामुळे श्रीधर सावळे यांच्या पत्रकारितेच्या कार्याची व्यापक दखल घेतली गेली असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!