सोमनाथपूर जिल्हा परिषद सर्कल मधून राजनंदनी सांगवे यांची उमेदवारी राहणार!
उदगीर (एल पी उगिले)
उदगीर तालुक्यातील सोमनाथपूर जिल्हा परिषद सर्कल मधून भीमराज सेना मार्गदर्शक तथा दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष, उदगीर नगर परिषदेमध्ये अनेक वर्ष नियोजन सभापती, सदस्य म्हणून कार्य केलेले आणि सध्या करत असलेले निवृत्तीराव सांगवे यांनी आपल्या भावाची मुलगी राजनंदनी भागवत सांगवे यांची उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले आहे.
माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय बनसोडे तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे, माजी आमदार प्रा. मनोहर पटवारी, पूर्वीच्या तोंडार जिल्हा परिषद सर्कल मधून भारतीय जनता पक्षातर्फे निवडून आलेल्या सौ. विजया बसवराज बिरादार, उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर नीटुरे यांचे निकटवर्तीय म्हणून निवृत्तीराव सांगवे ओळखले जात असले तरी त्यांची निकटता काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या सोबतही असल्याने ते कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मागतात? याकडे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
विकासाची जाण आणि भान असलेले निवृत्तीराव सांगवे यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये उदगीर शहरांमध्ये अनेक घरकुल मंजूर केले आहेत. तसेच दलित समाजासाठी त्यांनी मोठा लढा उभारला आहे. वैयक्तिक शिक्षणापेक्षा समाजहिताला प्राधान्य देऊन आज पर्यंत अन्यायाच्या विरोधात त्यांनी सतत आंदोलनात्मक भूमिका घेऊन पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे.
दलित आणि मुस्लिम समाजाच्या हितासाठी वेळोवेळी मोठमोठे आंदोलन आणि उपोषण करून शासनाचे अनेक समस्या कडे लक्ष वेधले आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी केलेले आंदोलन हे बहुचर्चित राहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना वाढीव शिष्यवृत्ती ही जाहीर केली होती. या आणि इतर अनेक बाबींमध्ये निवृत्तीराव सांगवे यांची कामगिरी गाजलेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पूर्ण ताकतीनिशी काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या सोबत राहून उदगीर मधून त्यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले आहे. त्यांच्या या कारकिर्दीमुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या दरम्यान ते कोणत्या पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर करतील? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एक प्रभावी उमेदवार म्हणून राजनंदिनी भागवत सांगवे या राहतील, यात तिळमात्र शंका नाही. असेही राजकीय जाणकार बोलत आहेत.
