महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात संत तुकाराम पुरस्कार वितरण व मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप

0
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात संत तुकाराम पुरस्कार वितरण व मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप

उदगीर (एल पी उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात संत तुकाराम पुरस्कार वितरण सोहळा तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर हे होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव प्रशांत पेन्सलवार व कोषाध्यक्ष माधव नौबदे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे गुणवंत माजी विद्यार्थी तथा महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूरचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल संत तुकाराम पुरस्काराने गौरविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी आपल्या प्रास्ताविकात संत तुकाराम पुरस्काराचा उद्देश स्पष्ट करताना, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त आयोजित विविध स्पर्धांचे स्वरूप व त्यामागील शैक्षणिक व सांस्कृतिक उद्दिष्टे सविस्तरपणे विशद केली.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून सामाजिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या उदयगिरी महाविद्यालयाच्या वैभवशाली परंपरेचा गौरव केला. तसेच संत तुकारामांच्या विचारांची वर्तमान काळातील प्रासंगिकता अधोरेखित केली. या पुरस्कारामुळे कार्यगौरवाचे समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली असून, त्याचबरोबर समाजाप्रती आपली जबाबदारी अधिक वाढल्याचे मतही त्यांनी मांडले. डॉ. वसंत बिरादार यांनी त्यांना प्राप्त झालेला संत तुकाराम पुरस्कार व पुरस्काराची रोख रक्कम उदयगिरी महाविद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांप्रति समर्पित केल्याची घोषणा करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच मराठी भाषेचे महत्त्व, वैभव व वैशिष्ट्य याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवहार स्वामी फुलवळकर यांनी केले, तर प्रा. डॉ. कोंडिबा भदाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास प्रा. डॉ. अनिल मुंडे, प्रा. डॉ. मारोती कसाब, प्रशांत डोंगळीकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!