पुणे येथे खून करून फरार झालेल्या आरोपींना लातूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
लातूर (एल पी उगिले) समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गंभीर गुन्हेगारीला आळा घालणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दल सातत्याने प्रभावी उपाययोजना राबवत आहे. याच अनुषंगाने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नियमितपणे चार्ली पेट्रोलिंग, गस्त, संशयितांवर नजर ठेवणे व गुन्हेगारांविरोधात तत्काळ कारवाई करण्यात येत आहे. या सतर्कतेमुळेच पुणे येथे खून करून फरार झालेल्या आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी यशस्वीरित्या अटक करून मोठे यश संपादन केले आहे.
दिनांक २५/०१/२०२६ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत चार्लीचे पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना भांबरी चौक ते साई नाका रिंगरोड दरम्यान, एच.पी. पेट्रोल पंप समोरील झाडाखाली अंदाजे १८ ते २० वयोगटातील पाच अनोळखी इसम संशयास्पद अवस्थेत बसलेले आढळून आले. चार्ली पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची, विसंगत व समाधानकारक नसलेली उत्तरे दिली. त्यांच्या वागणुकीत संशयास्पद हालचाली दिसून आल्याने चार्ली पथकाने त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली.
प्राथमिक चौकशीत सदर इसम पुणे येथून आल्याचे सांगत होते, मात्र त्यांच्या येण्यामागील कारण, राहण्याची ठिकाणे, ओळखीची माहिती याबाबत ते टाळाटाळ करीत होते. त्यामुळे चार्ली अंमलदारांनी सतर्कता बाळगत सदर इसमांचे फोटो पुणे पोलीस दलाच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवून खात्रीशीर माहिती मागविली. काही वेळातच पुणे पोलीस दलाकडून माहिती प्राप्त झाली की, हे पाचही इसम पुणे शहरातील खराडी भागात दिनांक २४/०१/२०२६ रोजी घडलेल्या खून प्रकरणातील फरार आरोपी आहेत. ही माहिती मिळताच चार्ली पथकाने तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या डीबी स्टाफला कळविले. गुन्हे प्रकटीकरण शाखा पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. योग्य ती खबरदारी घेऊन पाचही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले, व त्यांना एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले.
पोलीस स्टेशनमध्ये सखोल चौकशी केली असता, ते वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर ६९/२०२६, कलम १०३(१), ३३३, १८९(२), १८९(४), १९०, १९१(३), ३५२ भारतीय न्याय संहिता व सहकलम ४, २५ भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये दाखल असलेल्या खून व गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
सखोल तपासात आरोपींनी आपली नावे व राहण्याचे पत्ते कैलास विठल राठोड,गणेश चंद्रकांत कटटे,सुशील सुभाष कदम, (सर्व राहणार
रा. बायपास, खराडी, जि. पुणे) करण विठ्ठल तुरे, (रा. चंदननगर, पुणे),रोहित विकास गायकवाड, (रा. नानापेठ, पुणे)असे असल्याचे सांगितले. या सर्व आरोपींनी पुणे शहरातील खराडी परिसरात एका व्यक्तीचा खून करून गुन्हा केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्ह्यात पलायन केले होते. एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत लपून बसलेल्या या आरोपींना चार्ली पथकाच्या सजगतेमुळे अटक करण्यात आली, ही बाब लातूर पोलिसांच्या सतर्कतेचे व कार्यक्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
सदर बाब तात्काळ वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यांचे विशेष पथक एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दाखल झाल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर आरोपींना पुढील तपासकामी त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही संपूर्ण यशस्वी कारवाई अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर, मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर, समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर
यांच्या मार्गदर्शनाखाली खालील अधिकारी व अंमलदार व चार्ली पथकामधील तुळशीदास घडे,विजय जाधव, डीबी पथकामधील
सपोउपनि. भिमराव बेल्लाळे,पोलीस अंमलदार सचिन कांबळे, राजाभाऊ मस्के,अक्षय डिगोळे, सिद्धेश्वर टोम्पे, यांनी केली असून या कारवाईमुळे लातूर जिल्हा पोलीस दलाची तत्परता, गुन्हे शोधण्यातली कुशलता, आंतरजिल्हा समन्वय आणि नागरिकांच्या सुरक्षिततेप्रती असलेली बांधिलकी दिसून येते.
