लातूर मध्ये डीजे, डॉल्बी वापरून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या १० गणेश मंडळांवर व १० डीजे/डॉल्बी मालकांवर न्यायालयात खटले दाखल.

0
लातूर मध्ये डीजे, डॉल्बी वापरून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या १० गणेश मंडळांवर व १० डीजे/डॉल्बी मालकांवर न्यायालयात खटले दाखल.

लातूर (एल पी उगिले) शहरामध्ये सन २०२५ मधील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र काही गणेश मंडळांनी प्रशासनाने दिलेल्या आदेशाला न जुमानता ध्वनी प्रदूषण करत डीजे आणि डॉल्बीचा वापर करून सामाजिक सौख्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. मंडळातील काही कार्यकर्त्याचा धांगडधिंगा जरी झाला असला तरी मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण झाल्यामुळे या कालावधीत काही गणेश मंडळांकडून डीजे/डॉल्बीचा वापर करून ध्वनी प्रदूषण केल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच गणेश मंडळांना परवानगी देताना स्पष्ट अटी व बंधने घालण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम २००० चा भंग होणार नाही, तसेच मोठ्या क्षमतेच्या ध्वनी प्रक्षेपण यंत्रणा (डीजे/डॉल्बी) वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. या अटींची लेखी नोटीस देवून मंडळांना परवानगी देण्यात आली होती.
यासोबतच गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी वर्तमानपत्रांद्वारे, तसेच वेळोवेळी गणेश मंडळांच्या बैठका घेऊन पोलीस प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास अनेक मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, असे असतानाही दिनांक २७/०८/२०२५ रोजी गणेशस्थापना मिरवणुकांदरम्यान लातूर शहरातील १० गणेश मंडळांनी डीजे/डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषण केल्याचे आढळून आले .या प्रकरणी संबंधित १० गणेश मंडळांचे अध्यक्ष तसेच त्या मंडळांकडून वापरण्यात आलेल्या १० डीजे/डॉल्बी मालकां विरुद्ध दिनांक २७/०१/२०२६ रोजी मा. न्यायालय, लातूर येथे पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ चे कलम १५ व १९ तसेच ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० अन्वये खटले दाखल करण्यात आले आहेत.
सदर अपराधासाठी ०५ वर्षांपर्यंत कारावास अथवा एक लाख रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होण्याची तरतूद आहे.
ही संपूर्ण कारवाई अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर व मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांच्या नेतृत्वाखाली पोनि. सुनिल रेजीतवाड (पो.स्टे. गांधी चौक), पोनि. अभिषेक शिंदे (पो.स्टे. शिवाजीनगर), पोनि. समाधान चवरे (पो.स्टे. एमआयडीसी), तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोउपनि. राजाभाऊ सूर्यवंशी,पोलीस अंमलदार पांडुरंग सगरे व अरविंद वाघमोडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

लातूर जिल्हा पोलीस दलाचे आवाहन.

आगामी काळातील सर्व सण-उत्सव शांततेत, नियमांचे पालन करून साजरे करण्यात यावेत. आगामी येणाऱ्या सर्व सण उत्सवा दरम्यान डीजे/डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषण केल्यास संबंधित सण उत्सव मंडळांचे अध्यक्ष तसेच डीजे/डॉल्बी मालकांविरुद्ध पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ व ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!