लातूर शहरांमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर धाड, पीडित महिलांची सुटका, आरोपी अटक
लातूर (एल पी उगिले) लातूर शहरातील एका उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या आदर्श कॉलनी मध्ये स्वतःच्या फायद्यासाठी गरजू आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या महिलाकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या आंटीच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की,अनैतिक मानवी वाहतुकीविरोधात लातूर पोलिसांची कारवाई. आदर्श कॉलनीत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर धाड; ४ पीडित महिलांची सुटका, महिला आरोपी अटकेत
लातूर शहरामध्ये अनैतिक मानवी वाहतूक व वेश्या व्यवसायास पूर्णतः आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक, लातूर अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक, लातूर मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, लातूर यांच्यामार्फत सातत्याने विशेष धडक मोहिमा राबविण्यात येत आहेत.
या मोहिमेच्या अनुषंगाने लातूर शहरातील अदर्श कॉलनी परिसरात सुरु असलेल्या अनैतिक वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने धाड टाकून एका महिला आरोपीस ताब्यात घेऊन ४ पीडित महिलांची सुरक्षित सुटका केली आहे.सविस्तर माहिती अशी की,
लातूर शहरातील अदर्श कॉलनी येथील अदर्श सदनिका “सी” विंग, सातवा मजला, फ्लॅट क्रमांक ७०२ येथे एक महिला ही भाड्याने राहून लातूर शहर व परिसरातील महिलांना आर्थिक आमिष दाखवून त्या ठिकाणी बोलावून घेत होती व त्यांच्याकडून अनैतिक वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षास प्राप्त झाली होती.
सदर माहितीची खातरजमा करण्या साठी पोलीस पथकाने बनावट ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खात्री करून घेतल्यानंतर,बनावट ग्राहकाच्या ठरलेल्या इशाऱ्यावरून पोलीस पथकाने सदर फ्लॅटवर अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय चालविणारी महिला आरोपी तसेच वेश्या व्यवसायासाठी बोलावून घेतलेल्या ४ पीडित महिला आढळून आल्या. तात्काळ कारवाई करत आरोपी महिलेस ताब्यात घेण्यात आले व पीडित महिलांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४३ तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ चे कलम ३, ४ व ५ (पिटा अक्ट) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, पो.स्टे. शिवाजीनगर, लातूर हे करीत आहेत.सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आशोक आनंत्रे,सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके,
पोलीस अमलदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, निहाल मणियार
महिला पोलीस अमलदार लता गिरी, अंबिका घनगावे यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, लातूर येथील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण व गोपनीय पद्धतीने पार पाडली.
लातूर शहर व जिल्ह्यात अनैतिक मानवी वाहतूक, वेश्या व्यवसाय व महिलांच्या शोषणास कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षास त्वरित कळवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
