लातूर मध्ये अवैध गुटखा विक्रीवर कारवाई; वाहनासह १ लाख ०६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर (एल पी उगिले) शहर व परिसरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री, साठवणूक व वाहतूक रोखण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांच्या पथकाने दिनांक ०१/०२/२०२६ रोजी विवेकानंद चौक पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या एका इसमास रंगेहाथ पकडले आहे. दिनांक ०१/०२/२०२६ रोजी पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लातूर शहरात अवैध धंद्यांविरोधात माहिती संकलन करीत होते. दरम्यान सकाळी सुमारे ०९.४० वाजता नाईक चौक ते कंदील चौक रोडवर पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हा स्कूटी क्रमांक AP-23-AG-7770 वर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सदर स्कूटी थांबवून झडती घेतली असता, अॅक्टिव्हा गाडीच्या डिक्कीमध्ये व पाय ठेवण्याच्या जागी पांढऱ्या पोत्यामध्ये व निळ्या बॉक्समध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा मिळून आला. झडतीदरम्यान विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थांचे विविध पुडे,असा एकूण ३६,७००/- रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.तसेच हा गुटखा वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची अॅक्टिव्हा स्कूटी क्रमांक AP-23-AG-7770 (अंदाजे किंमत ७०,०००/- रुपये) असा एकूण १,०६,७००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रतिबंधित गुटखा, तंबाखू व पान मसाल्याची अवैध विक्री करण्यासाठी वाहतूक करीत असताना ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव शैलेश अंबादास पारसेवार, (वय ५१ वर्षे,रा. ब्लॉक नं. १९, कनेरी रिंग रोड, साई सृष्टी रो हाऊस, देसाई नगर, लातूर) असे असून सदर प्रकरणी पोलीस स्टेशन विवेकानंद चौक, लातूर येथे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५ व २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, लातूर अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक, लातूर मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, आनंद हल्लाळे व प्रवीण कोळसुरे यांनी पार पाडली.
