युतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा – आ.संजय बनसोडे
उदगीर (एल पी उगीले): ग्रामीण भागातील जनतेला सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी उदगीर मतदार संघातील नळगीर जिल्हा परिषद गट व नळगीर आणि नागलगाव पंचायत समिती गणातील उमेदवारांना मोठे मताधिक्य देवून निवडून द्या. असे आवाहन माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर मतदार संघातील नळगीर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सौ.वैजंतीमाला पंडित सुर्यवंशी व नळगीर पं.स. गणाचे उमेदवार धनराज नादरगे, नागलगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुप्रिया संतोष वाघे या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजीत संवाद दौरानिमित्त आ.संजय बनसोडे बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, नगरसेवक सचिन हुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, पंडित सुर्यवंशी, रामदास बेंबडे, धर्मपाल नादरगे, रमेश शेरीकर, प्रा.श्याम डावळे, शिवशंकर पांडे, रत्नाकर बिरादार, शुभम केंद्रे, शाहुराज किंवडे, संजय केंद्रे, एकनाथ गोजेगावे, राजीव वाघे, अंकुश वाघे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, आपल्या भागात भारतीय जनता पार्टीसाठी मोठे कष्ट घेवुन ग्रामीण भागात पक्षाचे विचार पोहचवुन पक्ष वाढवण्यासाठी कष्ट घेणारे प्रा. पंडित सुर्यवंशी व धर्मपाल नादरगे या दोन ज्येष्ठ समाजसेवकांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहून त्यांना विजयी करा.कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी या युतीचे सर्व उमेदवार हे जनतेच्या प्रश्नाची जाण असलेले उमेदवार आहेत. भविष्यात नळगीर गटाचा विकास करण्यासाठी हे उमेदवार कटीबध्द राहणार असुन जाती पातीचा विचार न करता विकासावर मत द्या. असे सांगून मी उदगीर मतदार संघाला जोडणारे सर्व रस्ते केले. पाणीपुरवठा खात्याचा राज्य मंत्री म्हणून कारभार पाहताना जलजीवन मिशन योजना मंजूर करुन आणली.नंतरच्या काळात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या. शेतक-यांना दिवसा विज देण्याचा माझा मानस होता, म्हणून मतदार संघात मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचे प्रकल्प आणले. त्यामुळे आता शेतक-यांना दिवसा विज मिळत आहे. ‘जे जे नव ते माझ्या उदगीर जळकोटला हव’ हे ब्रीद वाक्य घेवुन मतदार संघाचा विकास केला. सर्व जाती धर्माच्या लोकांना विविध सभागृह बांधुन दिले. जनतेला मूलभूत सुविधा पुरविल्या. सर्वांना सोबत घेवुन मतदार संघाचा सर्वांगीण विकास केला. यापुढे ही तो विकासाचा रथ आपल्याला कायम ठेवायचा आहे. त्यासाठी युतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. असे आवाहन आ.संजय बनसोडे यांनी केले.यावेळी नळगीरसह परिसरातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
