दुग्धव्यवसायातून स्वंयरोजगाराच्या मोठ्या संधी – डॉ. अनिल भिकाने

0
दुग्धव्यवसायातून स्वंयरोजगाराच्या मोठ्या संधी – डॉ. अनिल भिकाने

गुडसूर येथे सर्वपशुरोग निदान व उपचार शिबिर संपन्न
उदगीर (एल पी उगिले)
सध्याच्या काळात दुग्धव्यवसायात स्वंयरोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध असून गावातील सुशिक्षित तरुणांनी व महिलांनी पशुपालन व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी केले.
ते मौजे गुडसूर ता. उदगीर येथे श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर यात्रा महोत्सव समिती व पशुवैद्यकीय चिकित्सालय, गुडसूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्व पशुरोग निदान व उपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय कपाळे (उदगीर), डॉ. सचितानंद चव्हाण (वाढवणा), डॉ. रोहित चांगभले (मंगरूळ), एम.एस.डी. ॲनिमल हेल्थचे व्यवस्थापक कुणाल घुंगार्डे, उपसरपंच बालाजी देमगुंडे , प्रगतीशील शेतकरी विश्वनाथ होळसंबरे उपस्थित होते.
डॉ. भिकाने पुढे म्हणाले की, महिलांनी शासनाच्या विविध पशुसंवर्धन योजनांचा लाभ घेवून स्वतःचा पशुपालन व्यवसाय सुरू केल्यास कुटुंबाच्या उत्पन्नात मोलाची भर पडू शकते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी मेहनतीत अधिक दूध देणारी सुमारे २० जनावरे सांभाळल्यास गावात राहूनच दरमहा एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतर करण्याची गरज भासत नाही.
शिबिराची सुरुवात आदर्श देवणी गोपालक नागनाथ शेटकार यांच्या गाईच्या पूजनाने करण्यात आली. प्रास्ताविकात डॉ. सचितानंद चव्हाण यांनी शासनाच्या विविध पशुसंवर्धन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या शिबिरात परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. एकूण ७९ पशूंवर उपचार करण्यात आले. यामध्ये औषधोपचार, वंध्यत्व निवारण, किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच सर्व पशूंना जंतनाशक औषध देऊन गोचीडनाशक औषधांची फवारणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुडसूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे प्रमुख डॉ. मयुरेश हलबुर्गे, श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर यात्रा समितीचे अध्यक्ष अविनाश मरलापल्ले, उपाध्यक्ष विरोचन तोटकर तसेच पशुवैद्यकीय विभागातील पशुधन पर्यवेक्षक डॉ. साहेबराव गडदे, ज्ञानेश्वर बडे, सेवादाते संतोष कराड, ओंकार कारभारी,अमोल पवार,रोहन रांगदाळ व पशुसखी शीतल बिरादार यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विष्णुदास चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन यात्रा समितीचे खजिनदार आकाश तोटकर यानी केले.
या उपक्रमामुळे पशुपालकांमध्ये पशुधन आरोग्य व संवर्धनाबाबत जागृती निर्माण झाली असून शेतकरी व पशुपालकांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही असे लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा मानस यावेळी यात्रा समितीने व्यक्त केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!