उदगीर तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य
उदगीर (एल पी उगीले) उदगीर येथील तहसील कार्यालय निजाम काळात बांधले गेले होते. ते कार्यालय अपुरे पडत असल्यामुळे उदगीरचे आमदार तथा माजी मंत्री संजय भाऊ बनसोडे यांनी कोट्यावधीचा विकास निधी आणून तहसील कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय इतकेच नव्हे तर तालुक्यातील सर्व कार्यालय एकाच इमारती मध्ये व्हावेत, अशा उदात्त्य भावनेने आणि जनतेची सोय व्हावी म्हणून, महसूल भवन ही उभा केले आहे. तीन मजली टोलेजंग इमारती उभा राहिल्या असल्या तरी, या इमारतीच्या स्वच्छतेचा प्रश्न मात्र वेशीला टांगला गेला आहे.
तहसील कार्यालयातील कित्येक भिंतीचे कोपरे पानाच्या पिचकारी आणि तंबाखूच्या खाऊन थुंकलेल्या कचऱ्यामुळे अत्यंत गलिच्छ दिसत आहेत. शोभेसाठी लावलेल्या झाडांच्या कुंड्यामध्ये थुंकून त्या ठिकाणी लावलेली शोभेची झाडे आणि फुलांची झाडे ही देखील आता सुकली आहेत. स्वच्छतागृहातील अस्वच्छता तर किळस आणणारी आहे. सार्वजनिक मुतारी मधील अस्वच्छता आणि सांडपाणी जाण्याच्या पाईप तुंबलेला असल्यामुळे रोगराई पसरवण्याचे केंद्रस्थान बनत चालले आहे.
तालुका दंडाधिकार्याच्या कार्यालयात जर अशा पद्धतीची दुरावस्था असेल तर इतर शासकीय कार्यालयाने काय आदर्श घ्यावा? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. किमान नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून तरी स्वच्छतागृह आणि इतर परिसर स्वच्छ ठेवल्यास बरे होईल. अशा पद्धतीची अपेक्षा अनेक स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली आहे.
