अवैध धंदे थांबवण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी आमदार अमित देशमुख मैदानात लातूरच्या सुरक्षिततेसाठी काँग्रेस पक्ष मैदानात;पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याचे निवेदन सुपुर्द
लातूर (एल पी उगिले)
लातूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने सीमा
ओलांडली असून,सामान्य नागरिक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने सोमवार दि. २ फेब्रुवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी आमदार अमित
विलासराव देशमुख यांचे या संदर्भातील निवेदन लातुर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आग्रही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाद्वारे आमदार अमित
विलासराव देशमुख यांनी रविवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घडलेल्या प्रज्वल मस्के या तरुणाच्या हत्येचा संदर्भ देत पोलीस
प्रशासनाला जाब विचारला आहे. सदरील धक्कादायक घटना स्वतः आमदार अमित देशमुख यांनी पाहिली असून, भरचौकात लोकांसमोर तरुणाची हत्या होणे हे अत्यंत क्लेशदायक असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
लातूर हे शिक्षण आणि व्यापाराचे केंद्र आहे, मात्र मागच्या काही महिन्यां पासून वाढत चाललेल्या खुनांच्या घटना,अमली पदार्थांची विक्री आणि
जमिनींवरील अतिक्रमणे यामुळे शहराची प्रतिमा मलीन होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी लातुर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. लातूर शहर आणि जिल्ह्यात मागील काही महिन्यां पासून खून, दरोडे आणि लूटमारीच्या घटनांचे सत्र सुरू असल्याचे सांगत माहिती अधिकार कार्यकर्ता अनमोल केवटे यांची हत्या, औसा रोडवर भरदिवसा झालेली ३० लाखांची चोरी या सर्व घटनांमुळे गुन्हेगारावरील पोलिसांचा धाक
संपत चालल्याचे चित्र निर्माण होत आहे,जिल्ह्यातील चाकूर परिसरात अमली पदार्थांचा कारखाना सापडणे आणि शहरातील शाळा तसेच महाविद्यालयांच्या परिसरात ड्रग्जचे रॅकेट सक्रिय असणे,हे तरुण पिढीसाठी घातक असल्याचे
देखील त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले.अनेकठिकाणी
तक्रारी करूनही अवैध व्यवसायांवर ठोस कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी
नाराजी व्यक्त केली.
लातूर येथील शांतता, सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ मोक्का किंवा तडीपारीसारख्या कडक कारवाया करण्यात याव्यात. तसेच रात्रीची गस्त वाढवून अवैध धंदे कायमचे बंद करण्यात यावेत. आशा प्रकारच्या मागण्या देखील यावेळी शिष्टमंडळाकडून लातुर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आल्या असून, पोलिस प्रशासनाने तातडीने गुन्हेगारांवर वचक निर्माण नाही केल्यास जनतेच्या सुरक्षेसाठी
काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडन्यात येईल.असा इशाराही यावेळी
देण्यात आला.
या शिष्टमंडळात लातुर महानगर पालिकेचे गटनेते विजयकुमार साबदे तसेच काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी,नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
