तणाव मुक्त वातावरणात बारावीच्या परीक्षा व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी घेत आहेत मेहनत
लातूर (एल.पी. उगिले) बारावीच्या परीक्षा तणावमक्त आणि भयमुक्त वातावरणात व्हाव्यात,या संदर्भामध्ये महसूल प्रशासनाने शिक्षण व्यवस्थेला पूर्वी सूचना दिलेल्या आहेत. प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर भेटी देऊन पाहणी केली. लातूर लगत असलेल्या बाभळगाव येथील कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय येथील इयत्ता बारावी परीक्षा केंद्राला भेट देवून पाहणी केली. याठिकाणी नियुक्त बैठे पथकातील अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. तसेच कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षेसाठी केलेल्या चोख नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. परीक्षा केंद्राबाहेर उपस्थित पालकांसोबतही त्यांनी संवाद साधला, त्यांच्याकडूनही परीक्षा केंद्रावरील उपाययोजनांबाबत प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
