लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहात शुभचिंतन समारंभ

0
लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहात शुभचिंतन समारंभ

विद्यार्थिनींनी वसतिगृह जीवनातील अनुभव मनोगतातून केले व्यक्त

सातारा / प्रतिनिधी : "जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त, कष्ट व वेळेचे नियोजन गरजेचे असते. आजच्या स्पर्धेच्या युगात मोठे ध्येय साध्य करायचे असेल तर अभ्यासाबरोबरच आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि चांगले संस्कारही तितकेच महत्त्वाचे आहेत. मुलींनी विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते," असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते प्रा. शिवाप्पा पाटील यांनी केले. शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील मुलींच्या वसतिगृहात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित शुभेच्छा समारंभात ते बोलत होते.
शुक्रवार (ता. १३) रोजी रयत शिक्षण संस्था संचालित प्रसिद्ध ल. पा. वसतिगृहात दहावीच्या विद्यार्थीनींचा निरोप समारंभ अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे सहायक विभागीय अधिकारी तथा महाराजा सयाजीराव विद्यालयाचे प्राचार्य दिनेश दाभाडे होते. तर संजय लेंडवे, प्रा. ज्ञानेश्वर डोके, दशरथ रणदिवे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
यावेळी अध्यक्षस्थानावरून विद्यार्थिनींना अनमोल मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक डी. बी. दाभाडे म्हणाले की, "शाळेतील, वसतिगृहातील दिवस केवळ अभ्यासापुरते सीमित नसतात; येथे मिळालेले अनुभव, संस्कार आणि मूल्येच आयुष्याचा खरा पाया घडवतात." भविष्यकालीन यश संपादनासाठी मुलींनी कसून सराव करावा, नेहमी चिकाटीने अभ्यास करावा असे सांगून पुढील धवल यशासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थिनींनीही मनोगते व्यक्त करत आपले अनुभव आणि भविष्यातील उद्दिष्टे मांडली. यामध्ये साक्षी कासार, प्रगती कसबे, आचल खवळे, विद्या काळेल, समृद्धी इंगळे, विशाखा रणदिवे, अपूर्वा वाघमारे या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली. वसतिगृहातील मुलींनी आपल्या शाळेतील, वसतिगृहातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. दोन्ही ठिकाणी मिळालेल्या जिव्हाळ्याबद्दल मुलींनी कृतज्ञता व्यक्त केली. मुलींना यावेळी अश्रू अनावर झाले होते. या कार्यक्रमासाठी वसतिगृहातील सर्व  विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृह अधीक्षक स्वाती जगताप यांनी केले. साक्षी शेरे हीने आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!