पो. नि. रेजितवाड यांच्या पथकाची दमदार कामगिरी !!झटपट पकडली जबरी चोरी !!
लातूर : गांधी चौक पोलीस ठाण्याला प्रभारी अधिकारी म्हणून ज्येष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड रुजू झाल्यापासून या पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेला जणू चैतन्य प्राप्त झाले आहे. गुन्ह्याचा तपास काही तासातच लावण्यात आता गांधी चौक पोलीस पटाईत झाले आहेत. अशी चर्चा लातूरला चालू झाली आहे. गांधी चौक पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आपल्या हद्दीत एका वृद्धास मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम लुटणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास गंजगोलाई येथील मिरची लाईन परिसरात ही घटना घडली. फिर्यादी अजोमाद्यीन बाशूमियों शेख (रा. खुंटेगाव, ता. औसा, जि. लातूर) यांना आरोपीने अडवून “तुझ्या जवळ किती पैसे आहेत? ते मला दे” असे म्हणत मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील 6400 रुपये जबरदस्तीने काढून घेतले, आणि “कोणाला सांगितले तर जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिली.
या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 101/26 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३५१(२)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानुसार पोउपनि चित्ते, सफौ राजेंद्र टेकाळे, पोह प्रकाश भोसले, राम गवारे, रविसन जाधव, पोलीस नाईक संतोष गिरी, सचिन चंद्रपाटले व शिवराज भाडुळे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी मिरची लाईन, गंजगोलाई येथून विशाल उत्तम रणदिवे (वय २८, रा. वैशाली नगर, लातूर) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून लुटलेली 6400 रुपयांची रोख रक्कम मुद्देमाल म्हणून जप्त करण्यात आली आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि सोनकांबळे करीत आहेत.
