वाढवणा ग्रामीण रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत – आ.संजय बनसोडे
उदगीर (एल पी उगीले) : मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, उदगीर तालुक्यातील वाढवणा येथे गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची उभारणी केली असून या अधिवेशना नंतर ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेत उपलब्ध करणार असल्याची माहिती माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी बोलताना दिली आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांची आरोग्य सेवेच्या बाबतीत गैरसोय होत होती. ही बाब आ. संजय बनसोडे यांच्या लक्षात आल्यानंतर मागील त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी वाढवणा येथे ग्रामीण रुग्णालय मंजुर करुन त्याची उभारणी केली. तसेच मंगरुळ,घोणसी व गुडसुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले असून या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालय सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. या अनुषंगाने राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांची भेट घेऊन वाढवणा ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची पदभरती, ट्रॉमा केअर यासह राहिलेले सर्व प्रश्न मार्गी लावावेत. अशी विनंती आमदार संजय बनसोडे यांनी केली या त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करुन आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी सर्व प्रश्न मार्गी लावून अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वाढवणा ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
वाढवणा येथील या ग्रामीण रुग्णालया मुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध होणार असुन दहा – पंधरा किलोमीटरचा प्रवास करून उदगीर शहरात येणाऱ्या रुग्णांसाठी हे ग्रामीण रुग्णालय नवसंजीवनी देणारे असल्याने आमदार संजय बनसोडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
