मानवी जीवनाची उकल करणारा ग्रंथ म्हणजे कठोपनिषद होय – डॉ. नरेंद्र शिंदे.
उदगीर (एल पी उगीले)
भारतीय संस्कृती ही विज्ञानाधिष्ठित गुरु-शिष्य परंपरेवर आधारित आहे. येथे ज्ञानपरंपरेला अति महत्व असून आत्मा, परमात्मा आणि ब्रह्म यांची जाणीव होते. उपनिषदामध्ये सांगितलेले जीवनाचे श्रेय व प्रेय मार्ग या संदर्भाने यमाचार्य आणि नचिकेता या गुरु शिष्यांमधील संवादाच्या माध्यमातून मानवी जीवनाची उकल करणारा ग्रंथ म्हणजे कठोपनिषद होय. असे मत डॉ. नरेंद्र शिंदे यांनी व्यक्त केले.
पंधरा वर्षापासून अखंडितपणे चालू असलेल्या चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत श्रीराम चामले यांच्या अध्यतेखाली संपन्न झालेल्या वाचक संवादचे ३५५ वे पुष्प संस्कृतचार्य प्रा. डॉ.नरेंद्र शिंदे यांनी अज्ञात ऋषींकृत कठोपनिषद या ग्रंथावर बोलताना म्हणाले की, आत्मा-बुद्धी-मन- ज्ञानेन्द्रिय यांची सत्कार्ये, दानधर्म पाप-पुण्य, सुख-दुःख, कर्मकांड-वृत्ती या सर्वांची कारणे या ग्रंथात सविस्तरपणे मांडलेली असून स्वर्ग-नरक, जप-तप, यज्ञ-साधना यांची साधने आणि अंतिम सत्य सांगतानाच यज्ञ म्हणजे काय? त्याची प्रक्रिया आणि ते विज्ञानाशी कसे निगडित आहे? याबद्दल सविस्तर मांडणी या ग्रंथात केलेली आहे.
अत्यंत प्रभावी संवादानंतर झालेल्या चर्चेत अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली. अध्यक्षीय समारोपात श्रीराम चामले म्हणाले की सर्वांसाठी अत्यंत उपयोगी असणारा हा वाचक संवाद याचा लाभ जास्तीत ज्यास्त लोकांनी घ्यावा.
शासकीय दूध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या अत्यंत प्रभावी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक अनंत कदम यांनी केले तर आभार प्रा. सुरेश शिंदे बेंबरेकर यांनी मानले.
