सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी स्थानबद्ध.
लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर सातत्याने कठोर आणि नियोजनबद्ध कारवाया करण्यात येत आहेत.जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर आळा बसावा व समाजात कायद्याचा धाक निर्माण व्हावा, या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत व वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारावर विविध कायद्यान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहेत.त्याच अनुषंगाने लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अमोल ज्योतीराम गंभीरे (वय २६ वर्षे, रा. सिकंदपूर ता. जि. लातूर) याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारे (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर तसेच अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे गुन्हेगार यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याविषयीचा कायदा सन १९८१ (एमपीडीए) अंतर्गत प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.
सदर आरोपी हा सवयीचा व धोकादायक गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध लातूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस ठाणे शिवाजीनगर लातूर, एमआयडीसी लातूर, विवेकानंद चौक लातूर तसेच गांधी चौक लातूर येथे खुनाचा प्रयत्न, चोरी, मारामारी यांसारख्या गुन्ह्यांसह एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी तब्बल १३ गुन्हे हे शरीरा विरुद्धचे तर २ गुन्हे मालमत्तेविरुद्धचे आहेत. याशिवाय पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे ४ अदखलपात्र नोंदी करण्यात आलेल्या आहेत. आरोपीच्या सातत्याने सुरू असलेल्या गुन्हेगारी हालचालींमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.
सदर बाबीची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या देखरेखीखाली स्थापन करण्यात आलेल्या प्रतिबंधक कक्षामार्फत आरोपीविरुद्ध माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे लातूर ग्रामीण अरविंद पवार यांनी आरोपी विरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी लातूर यांच्याकडे सादर केला.सदर प्रस्तावाचा सखोल अभ्यास करून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी लातूर यांनी अमोल ज्योतीराम गंभीरे यास दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी एक वर्ष कालावधीसाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सदर आरोपीस ताब्यात घेऊन आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली व पुढील कालावधीसाठी त्यास मध्यवर्ती कारागृह, हार्सूल रोड, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वात सपोनि डोंगरे, पोउपनि बी. के. मोरे, पोलीस अंमलदार महेबूब तांबोळी, बालाजी यादव, वाजिद चिकले, नितीन पाटील, दाजीबा यादव, अंबादास पारगावे, संतोष थोरात, सुदर्शन पाटील व मुकेश कोळी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
लातूर जिल्हा पोलीस दलाचे कार्य तत्पर, काटेकोर व नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर भविष्यातही अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
