रेणापूर तालुक्यातील ७ वर्षांपासून प्रलंबित असलेला जमीन वाद पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर या मोहिमे अंतर्गत निकाली.
लातूर (एल पी उगीले) घनसरगाव येथे रेणापूर पोलीसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सुरू केलेल्या पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर या मोहिमेअंतर्गत थेट शेतात जाऊन तब्बल सात वर्षापासून प्रलंबित असलेला आणि सतत आरोप प्रत्यारोप होत असलेला वाद पोलिसांच्या मध्यस्थीमुळे ५ अदखलपात्र गुन्हे व ६ अर्ज असलेले प्रकरण निकाली निघाले आहे.
यासंदर्भात थोडक्यात माहिती अशी की,लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत ग्रामीण भागातील किरकोळ वाद त्वरित, शांततेत व सामोपचाराने सोडविण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हाभरात राबविण्यात येत असलेल्या “पोलिस शेतकऱ्याच्या बांधावर” या अभिनव उपक्रमाला सातत्याने यश मिळत असून, दिनांक २३ मार्च २०२६ रोजी घनसरगाव (ता. रेणापूर) येथे अशाच एका दीर्घकालीन वादाचा यशस्वी तोडगा काढण्यात आला.
घनसरगाव येथील अर्जदार विलास शिवाजी आमनावर व गैरअर्जदार परमेश्वर आमनावर यांच्यामध्ये शेतीच्या बांधासंदर्भात मागील तब्बल सात वर्षांपासून वाद सुरू होता. या वादामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला होता तसेच गावातील सामाजिक सलोख्यावर देखील त्याचा परिणाम होत होता. या कालावधीत दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध पोलीस स्टेशन रेणापूर येथे ५ अदखलपात्र गुन्हे व ६ अर्ज दाखल केले होते, ज्यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले होते.
सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुधाकर देडे कर्मचारी यांनी “पोलीस शेतकऱ्याच्या बांधावर” या मोहिमेअंतर्गत थेट संबंधित शेतजमिनीवर भेट देऊन, परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी गावचे पोलीस पाटील, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक व दोन्ही पक्षांची उपस्थिती ठेवून सखोल चर्चा करण्यात आली. दोन्ही बाजूंचे म्हणणे संयमाने ऐकून घेऊन, त्यांना कायदेशीर बाबी तसेच सामाजिक परिणाम समजावून सांगण्यात आले.
पोलीसांच्या प्रभावी मध्यस्थीमुळे व स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आणि अखेर परस्पर संमतीने हा सात वर्षांपासून प्रलंबित असलेला वाद सामोपचाराने मिटविण्यात यश आले. दोन्ही पक्षांनी भविष्यात कोणताही वाद न वाढविता शांततेत व सौहार्दाने राहण्याचे लेखी व मौखिक आश्वासन दिले आहे.
या यशस्वी समेटामुळे केवळ दोन कुटुंबांमधील तणाव दूर झाला नसून, संपूर्ण गावात शांतता व एकोपा वाढण्यास मदत झाली आहे. “पोलीस शेतकऱ्याच्या बांधावर” या उपक्रमामुळे पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत असून, न्यायालयीन प्रक्रिया टाळून वेळ व खर्चाची बचत होत आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून अशा प्रकारच्या उपक्रमांद्वारे गावपातळीवरील वाद तात्काळ सोडवून सामाजिक सलोखा टिकविण्यास प्राधान्य दिले जात असून, नागरिकांनी देखील अशा उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
