सुधाकर बावकरांच्या तपास कौशल्याने एलसीबीची वाढली शान !!
उत्कृष्ट तपासाच्या अभिमानाने लातूर पोलिसांची उंचावली मान !!
लातूर (ॲड. एल. पी. उगीले) लातूर जिल्ह्यातील कासार शिरशी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तांबाळा येथे काही दिवसापूर्वी कार्ड रूमवर धाडसी दरोडा टाकण्याची हिंमत काही गुन्हेगारांनी केली होती. लातूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एका बाजूला जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात गाजत असताना, सराईत गुन्हेगारांनी अशा पद्धतीच्या दरोड्याची तयारी करून बराच वेळ रेकी करून दरोडा टाकला. मात्र कार्ड रूम मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते चोरटे अडकले, एका बाजूला लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे सुधाकर बावकर आणि तेवढ्याच ताकतीने काम करणारे त्यांचे सहकारी असताना, चोरट्यांनी मोठी हिम्मत केली. मात्र तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेला सतर्क केले. तसेच कासार सिरसी पोलिसांनाही या अनुषंगाने आवश्यक ते मार्गदर्शन करून तपासाची दिशा सांगितली होती.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कासार शिरशी पोलिसांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून पाठलाग सुरू केला होता. पोलीस आपल्या मागावर आले हे लक्षात येताच चोरटे सावध झाले, अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्याचा डाव त्यांनी रचला होता. मात्र तशाही धावपळीत कासार सिरसी पोलिसांनी एका चोरट्याला ताब्यात घेण्यात यश मिळवले होते. या सर्व अनुषंगाने पोलीस प्रशासन आत्मचिंतन करत असतानाच, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी आणि त्यांच्या विशेष पथकाला या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले होते. या मार्गदर्शनाच्या आधारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आढळून आलेल्या अनोळखी आरोपींच्या अनुषंगाने अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली होती.
यापूर्वीच कासार शिरशी पोलिसांनी अर्थात प्रभारी अधिकारी प्रवीण राठोड यांनी आपल्या आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला म्हणजेच औराद शहाजानी, किल्लारी, निलंगा, उमरगा, औसा आणि कर्नाटक राज्यातील बसवकल्याण पोलीस स्टेशन येथे या गुन्ह्याच्या अनुषंगाने कल्पना दिली होती. तसेच योग्य ती नाकाबंदी करण्याची विनंती केली होती. या गुन्हा मध्ये वापरलेली बिना नंबरची इनोव्हा गाडी भरधाव वेगाने शिराढोणकडे पळून जात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्या अनुषंगाने पाठलाग करून शिराढोण पाटी येथील नाका बंदी पॉईंटवर सदर वाहन अडविले, त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच, पोलिसांनी मोठ्या शीताफीने एका आरोपीला पकडले होते. त्याचे नाव कार्तिक कल्लप्पा भोकले (वय 27 वर्ष राहणार भूसनी वाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव) असे असल्याचे सांगण्यात आले. इतर चार साथीदारासह सदर दरोड्यात सहभागी असल्याची त्यांनी कबुली दिली होती. त्याच्या ताब्यातून वाहन, मोबाईल फोन तसेच दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले.
मात्र या घटनेमुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता. पोलीस प्रशासनाबद्दल चीड निर्माण झाली होती. तसेच अनेक व्यावसायिकांना भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर या गुन्ह्याचा शोध लागणे गरजेचे होते. त्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा धूमे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर अरविंद रायबोले, स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी सुधाकर बावकर तसेच इतर अधिकाऱ्यांनी या अनुषंगाने तपासाला सुरुवात केली होती.
कासार सिरसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, प्रताप गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अजय पाटील, पोलीस अंमलदार राजू इंगळे, हरी डावरगावे, आबा इंगळे, शंकर बुडे, मनोज चव्हाण, श्रीनिवास देशमुख, बाळू गायकवाड, नवनाथ इंदापुरे इत्यादींनी संयुक्तपणे कारवाई सुरू केली होती.
मात्र पोलिसांना म्हणावे तसे यश येत नव्हते.
या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने आपल्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवायला सुरुवात केली. अत्यंत बारकाईने व तांत्रिक पद्धतीने तपास करायला सुरुवात केली. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी विशेष पथक निर्माण केले. त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वातील पथकाने मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीनुसार उमरगा जिल्हा धाराशिव येथे शोध मोहीम राबवली. उमरगा आळंद रोडवरील भुसणी टी पॉइंट परिसरात आरोपी लपून बसल्याची माहिती मिळताच, पथकाने तात्काळ सापळा रचून दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे संजय सिंह अमरसिंह राठोड उर्फ राजपूत (रा. चौसला राजस्थान) आणि रेवन उर्फ रोहन उर्फ बंटी बिरू सोनटक्के (रा. मुरूम तालुका उमरगा जिल्हा धाराशिव सध्या राहणार दिघी पुणे) असे असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भामध्ये आरोपीकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्हा इतर साथीदारासह केल्याची कबुली दिली असून या गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा क्रिस्टा कार त्यांनी लातूर शहरातून चोरी केल्याचे उघड झाले आहे. तपासा दरम्यान असे निष्पन्न झाले की, विवेकानंद चौक पोलीस स्टेशन लातूर येथे दाखल असलेल्या गुरंन 155 /26 या वाहन चोरी प्रकरणातील इनोव्हा क्रिस्टा (क्रमांक एम एच 24 ए एस 5200) हीच गाडी सदर गुन्ह्यात वापरण्यात आली होती. यापूर्वी कारवाईत एक आरोपी अटक करण्यात आला होता. त्या अनुषंगाने तपासाला वेग देण्याचे काम चालू असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुढील कारवाई करून आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्याचा तपास अधिक मजबूत करण्यात आला असून संपूर्ण टोळी अटक करण्यात येईल, अशी खात्री पोलीस प्रशासनाने दिली आहे. सदर आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कासार शिरशी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध घेण्याचे कामही पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाकडून सुरू आहे. ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हसबे, रामलिंग शिंदे, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड यांच्या विशेष पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असून इतर आरोपीच्या मागावर विशेष पथक असल्याचे सांगण्यात येत आहे.
लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली एकापेक्षा एक गुंतागुंतीच्या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये यश मिळवले असून एक विश्वासार्हता निर्माण केली आहे. त्याबद्दल सर्वत्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कौतुक केले जात आहे.
चौकट……..
खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींनाही एलसीबीने उचलले……
एकूण कामगिरीच्या संदर्भामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कौतुक होत असतानाच, लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कावळे नगर परिसरामध्ये घडलेल्या खुनाच्या घटनेत, दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने अटक करून आपले बौद्धिक कौशल्य तसेच तपासातील प्रसंगावधान दाखवून दिले आहे. गुन्हे उघड करण्याच्या तत्परतीमुळे आणि तपासाच्या योग्य दिशेमुळे संपूर्ण जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कौतुक केले जात आहे.
