डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लातूर शहरात विशेष वाहतूक नियोजन; नागरिकांना सहकार्याचे आवाहन.

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लातूर शहरात विशेष वाहतूक नियोजन; नागरिकांना सहकार्याचे आवाहन.
लातूर (एल पी उगीले)भारताचे संविधान शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी लातूर शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम, मिरवणुका व अभिवादन सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत, सुरक्षित व शिस्तबद्ध ठेवण्यासाठी विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव हा लातूर शहरात दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः टाऊन हॉल मैदान, संविधान चौक, शिवाजी महाराज चौक परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती राहते. यावेळी मिरवणुका, मानवंदना व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे प्रमुख रस्त्यांवर गर्दी वाढते.ही परिस्थिती लक्षात घेता वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, आपत्कालीन सेवा सुरळीत राहाव्यात व नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दिनांक 14/04/2026 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत खालील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.
पी.व्ही.आर चौक ते संविधान चौक (पाण्याची टाकी), दयानंद गेट, शिवाजी महाराज चौक ते अशोक हॉटेल मार्ग, जुना रेणापूर नाका ते शिवाजी महाराज चौक मार्ग,
गरुड चौक ते गंजगोलाई, मुख्य बसस्थानक, मिनी मार्केट मार्गे टाऊन हॉल परिसर
या मार्गांवर दुचाकी, चारचाकी, एस.टी. बसेस, ट्रक, टेम्पो, टॅक्सी आदी सर्व वाहनांना बंदी राहील.
पर्यायी मार्गांची व्यवस्था
नागरिकांच्या सोयीसाठी वाहतुकीसाठी खालील पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत:
पी.व्ही.आर चौक मार्गे येणारी वाहने रिंगरोड, नवीन व जुना रेणापूर नाका मार्गे वळविण्यात येतील.
औसा रोडकडून येणारी वाहने आशियाना बंगला, साईधाम, खाडगाव टी-पॉईंट मार्गे पर्यायी रस्त्यांचा वापर करतील.
अंबाजोगाई रोडवरील वाहने सिद्धेश्वर मंदिर, गरुड चौक व बालाजी मंदिर मार्गे शहरात प्रवेश करतील.
नांदेड रोडवरील वाहने गरुड चौक, नविन रेणापूर नाका, रेल्वे स्टेशन मार्गे किंवा बाभळगाव नाका, राजीव गांधी चौक मार्गे वळविण्यात येतील.
तसेच शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी पॅरलल रोड, गांधी चौक, बस्वेश्वर महाविद्यालय, सुतमिल रोड आदी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना महत्त्वाच्या सूचना.
नागरिकांनी वाहतूक नियोजनाचे काटेकोर पालन करावे,शक्यतो सार्वजनिक वाहतूक किंवा पर्यायी मार्गांचा वापर करावा.गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक वाहन वापर टाळावा.पोलीस प्रशासनास सहकार्य करून वाहतूक सुरळीत ठेवण्यात मदत करावी.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, सदर वाहतूक नियोजन हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांनी संयम राखून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. सदर वाहतूक नियोजन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 33 (1) (व) अन्वये लागू करण्यात आले असून, दिनांक 14/04/2026 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू राहील.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!