सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिर उदगीर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

0
सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिर उदगीर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

उदगीर (एल पी उगीले ) सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून शिक्षणाबद्दलची प्रेरणा अधिक दृढ झाली.
या कार्यक्रमास महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस कल्याण पाटील, उदगीर तालुका अध्यक्ष संतोष बिरादार,माजी नगरसेवक विजयकुमार चवळे, माजी पंचायत समिती सदस्य बबन धनबा, उद्योजक रामेश्वर बिरादार जकनाळकर, सतीश पाटील मानकीकर, सुभाष बिराजदार ,नाना ढगे, गणेश जाधव, प्रा. राहुल आतनुरे, संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव निटुरे, मुख्याध्यापिका अनिता जगताप मॅडम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी मान्यवरांनी दिलीपरावजी देशमुख यांच्या सहकार, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील भरीव आणि लोकाभिमुख कार्याचा गौरव करत त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “ दिलीपरावजी देशमुख हे गोरगरिबांचे खरे कैवारी असून त्यांनी समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचले आहे. त्यांचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे,” अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
सरचिटणीस कल्याण पाटील यांनी शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचे कौतुक करत, “ही शाळा केवळ शिक्षण देत नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे एक संस्कारमंदिर आहे,” असे गौरवोद्गार काढले.
तालुका अध्यक्ष संतोष बिरादार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, “या मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य उपयोग करून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा आणि समाजात आदर्श नागरिक म्हणून उभे राहावे,” असे आवाहन केले.
उद्योजक रामेश्वर बिरादार जकनाळकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. “विद्यार्थ्यांच्या शिक्षणात केलेली मदत हीच खरी समाजसेवा असून अशा उपक्रमातून अनेकांचे भविष्य उज्ज्वल होईल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव निटुरे यांनी शाळेच्या प्रगतीबाबत बोलताना 2047 पर्यंत शाळेला अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला. “प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत तंत्रज्ञानाधारित शिक्षण पोहोचवून त्यांना स्पर्धात्मक युगात सक्षम बनविणे हे आमचे ध्येय आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व संगीत शिक्षक श्याम कुलकर्णी सर यांनी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली व वातावरणात उत्साहाची लहर निर्माण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनमंत बिरादार सर यांनी केले. सूत्रसंचालन डी.एस. बिरादार यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन विनोद कोयले व भागवत पेठे यांनी व्यक्त केले.एकूणच, समाजातील दानशूर व्यक्तींच्या अशा उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळत असून “शिक्षण हेच खरे सामर्थ्य” हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!