दावणगाव येथे ‘समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; ७०० पेक्षा अधिक अर्ज निकाली

0
दावणगाव येथे ‘समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; ७०० पेक्षा अधिक अर्ज निकाली

उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील देवर्जन महसूल मंडळात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आयोजित “समाधान शिबिर” उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरामधून नागरिकांना विविध महसूल सेवा एकाच ठिकाणी, जलद व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या.
शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर कामकाज पार पडले असून, ‘एक खिडकी योजना’ अंतर्गत तब्बल ७०९ अर्ज निकाली काढण्यात आले. तसेच २८७ सातबारा वाटप, २६८ आठ-अ (८-अ) वाटप, तसेच ३०२ विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याशिवाय फेरफारची ९ प्रकरणे निकाली काढण्यात आली व ४ सातबारा दुरुस्ती अर्ज स्वीकृत करण्यात आले. शिधापत्रिकांचे ३८ वाटप तसेच कमी-जास्त पत्रिकेची १ अंमलबजावणी करण्यात आली.
शिबिरादरम्यान विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना पारदर्शक, तत्पर व परिणामकारक सेवा देण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक वेगाने व अचूकतेने करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी सुशांत शिंदे (उपविभागीय अधिकारी, उदगीर) यांनी मार्गदर्शन करताना नागरिकांच्या तक्रारी वेळेत निकाली काढण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच तांत्रिक अडचणी दूर करून सेवा अधिक सुलभ करण्याचे, विद्यार्थी व पालकांनी आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे वेळेत काढून घेण्याचे, रस्ते विषयक तक्रारींचे निवारण करण्याचे तसेच मतदार पडताळणी मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमास सर्व नायब तहसीलदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व सरपंच, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी, पंचायत समिती विभाग, महिला व बालकल्याण विभागाचे प्रकल्प अधिकारी, भूमि अभिलेख विभागाचे उपाधीक्षक, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आशा कार्यकर्त्या तसेच अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम बोरगावकर (तहसीलदार, उदगीर) यांनी केले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन मंडळ अधिकारी विजयकुमार उस्तुरे तसेच देवर्जन मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी केले.
या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना त्वरित सेवा देण्याचा उद्देश यशस्वीरीत्या साध्य झाला असून, महसूल विभाग नागरिकांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!