साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी स्वप्निल अण्णा जाधव
उदगीर (प्रतिनिधी) साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 126 सार्वजनिक जयंती महोत्सवाच्या नियोजनासाठी मातंग समाजाची एक महत्त्वपूर्ण बैठक उदगीरच्या शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये ही बैठक बन्सीलाल कांबळे (उदयगिरी) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत जयंती महोत्सवाचे नियोजन विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम तसेच समितीची निवड यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी सर्व उपस्थित समाज बांधवांच्या वतीने एक मताने स्वप्निल अण्णा जाधव यांची साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपस्थित आणि त्यांच्या निवडीचे जंगी स्वागत करत टाळ्यांचा कडकडाट केला.
या बैठकीसाठी समाजाचे नेते अजित कांबळे, शेषेराव करखेलीकर, बालाजीराव गोटमुकले यांनी मार्गदर्शन करत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी आणि समाजात ऐक्य बळकट करण्यासाठी जयंती महोत्सव भव्य व प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले.
यावेळी नगरसेवक अमर सूर्यवंशी यांनी उपस्थित राहून सर्व समितीला शुभेच्छा दिल्या. समाज हिताच्या उपक्रमासाठी आपण नेहमी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. या बैठकीस पत्रकार अर्जुन जाधव, अनिल जाधव, आणि विश्वनाथ गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. तसेच रामेश्वर शिंदे, पप्पू गायकवाड, सुधाकर सूर्यवंशी, अरविंद शिंदे, हुसेन अंधारे, बेद्रे रविंद्र, राजू सूर्यवंशी, बालाजी कारामुंगीकर यांच्यासह मातंग समाजातील अनेक समाज बांधव, ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्निल अण्णा जाधव यांनी समाजाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानले. सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या सार्वजनिक जयंती महोत्सवाचे आयोजन शिस्तबद्ध, भव्य आणि संस्मरणीय करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीचा समारोप समाजातील एकता, बंधुता आणि सामाजिक प्रगतीचा संकल्प करून करण्यात आला. या बैठकीचे सूत्रसंचालन पप्पू गायकवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन अजित कांबळे यांनी केले. जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
