खाजगी संस्थेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन खाजगी संस्थेतच करा
खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाचे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन
लातूर (प्रतिनिधी) : बोगस विद्यार्थी प्रवेश व इतर कारणाने लातूर जिल्ह्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांची पदे अतिरिक्त झाली आहेत. या शिक्षकांचे समायोजन खाजगी संस्थेतच करावे या मागणीसाठी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने लातूर जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात ठेवण्यात येणाऱ्या 100 बिंदुनामावलीमध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप करून खुल्या प्रवर्गाचा हक्काच्या जागा मागासवर्गाकडे वळवल्या जातात हे शासनाने नेमलेल्या चौकशी समिती अहवालातून सिद्ध झालेले आहे. या अहवालाची अंमलबजावणी करून बींदूनामावली अद्यावत करण्याचे शासनाचे आदेश होते. मात्र या चौकशी अहवालानुसार बिंदुनामावली अद्यावत करण्यात आली नाही . भ.ज.क. प्रवर्गातून लातूर जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांची नोंद त्यांच्या मागासवर्गात न करता खुल्या प्रवर्गात करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा परिषद मधून लातूर जिल्हा परिषदेकडे नियुक्तीचा प्रवर्ग चुकीचा नोंदवून आंतरजिल्हा बदली मिळवलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या रद्द करा अशी मागणी महासंघाने आपल्या निवेदनात केली आहे.
सन 2010 साली सह. आयूक्त मागासवर्ग कक्ष, औरंगाबाद कार्यालयाने लातूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांची बिंदुनामावली मंजूर करून दिली होती. या बिंदुनामावलीमध्ये मागासप्रवर्गातून नोंदवलेल्या 130 शिक्षकांकडून लातूर जिल्हा परिषदेने बेकायदेशीरपणे खुलासा पत्रे घेऊन त्यांची नोंद आगामी सर्व बिंदूनामावलीमध्ये खुल्या प्रवर्गात केली आहे. या 130 शिक्षकांची नोंद शासन मान्य 2010 च्या बिंदुनामावलीनुसार त्यांच्या मागासवर्गात करायला हवी होती मात्र जिल्हा परिषदेने तसे केले नाही.
शासनाच्या बदली धोरणानुसार एका शिक्षकाला त्याच्या सेवाकाळामध्ये केवळ एक वेळाच आंतरजिल्हा बदली करण्यात ती संधी दिली जात होती. केवळ अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांना दुसऱ्यांदा आंतरजिल्हा बदलीचे लाभ दिला जात होता. सन 2015 यावर्षी दोन शिक्षकांना अपवादात्मक परिस्थिती नसताना दुसऱ्यांदा आंतरजिल्हा बदलीचा लाभ देण्यात आला . या प्रकरणावर आक्षेप घेतल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाच सदस्यांची चौकशी समिती नेमली. या चौकशी समिती सदस्यांनी सदर बदली कायदेशीर आहे असा अहवाल तयार केला. या सदस्यांची चौकशी व्हावी, लातूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची रिक्त पदे तातडीने पदोन्नतीने भरण्यात यावीत , खोटी माहिती भरून आंतरजिल्हा बदली मिळवलेल्या शिक्षकावर कारवाई व्हावी अशा मागण्या आंदोलन करत असलेल्या खुल्या प्रवर्गात रुजू झालेल्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.