लातूर मनपास जीएफसी फाईव्ह स्टार मानांकन – मराठवाड्यातील एकमेव मनपा

लातूर मनपास जीएफसी फाईव्ह स्टार मानांकन - मराठवाड्यातील एकमेव मनपा

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत दिल्लीत होणार पुरस्कार वितरण

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये लातूर महानगरपालिकेस जीएफसी शहराचा दर्जा प्राप्त झाला असून फाईव्ह स्टार मानांकन मिळाले आहे. असे मानांकन मिळवणारी लातूर ही मराठवाड्यातील एकमेव महानगरपालिका आहे. दि.२० नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेने सुरुवातीपासूनच कचरामुक्त शहराचे ध्येय ठेवून काम केले. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि गल्लीबोळातील कचरा वर्गीकरण करून संकलित करण्यासोबतच प्रक्रिया प्रकल्पही उभारला. मनपाच्या कचरा डेपोवर संकलित केल्या गेलेल्या ३ लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करून ६ एकर जागा रिकामी केली. शहरात चार ठिकाणी विकेंद्रीत कचरा विलगीकरण केंद्रांची स्थापना केली. कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रकल्प उभे केले. बदलत्या काळानुसार आधुनिकतेची कास धरत कचरामुक्तीचे व्यवस्थापन केले. शहराच्या बाजारपेठांमध्ये दिवसा स्वच्छता करणे अडचणीचे असल्याचे लक्षात आल्यानंतर रात्र सफाई मोहीम सुरू करून बाजारपेठांची दैनंदिन स्वच्छता केली गेली. कचरामुक्तीचा संकल्प पूर्णत्वास नेतानाच सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात आला.या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज चार लक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया सुरू झाली. मराठवाड्यात पहिली आणि एकमेव असणारी सॅनिटरी लॅंडफिल साईट लातूर महानगरपालिकेने उभारली. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने होणारे गणेश विसर्जन न करता मुर्ती दान करण्याचा उपक्रम राबवला.
मनपाकडे केवळ चारशे कर्मचारी असताना हे सर्व कार्य यशस्वीपणे पार पाडत लातूर शहर स्वच्छ व सुंदर करण्याचे काम मनपाने केले.
या कार्याची दखल घेत लातूर शहर महानगरपालिकेस फाइव्ह स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. लातूर महानगरपालिकेत जीएफसी फाइव्ह स्टार शहराचा दर्जा प्राप्त झाला आहे.
लातूर शहर महानगरपालिकेला देश पातळीवर मिळालेला पुरस्कार हे समस्त लातूरकर तसेच मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे श्रेय आहे. मनपाने स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. शहरातील नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करत आपापल्या घरातील ओला व सुका कचरा वर्गीकरण करून घंटागाड्यांना दिला. यामुळेच लातूर शहरातील स्वच्छतेची नोंद देशपातळीवर झाली. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणारा हा सन्मान समस्त लातूरकरांचा आहे.

About The Author