लातूर-बार्शी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात; ना. गडकरी यांचे आ. कराड यांच्याकडून आभार
लातूर (प्रतिनिधी) : केंद्रीय वाहतूकमंत्री नितीनजी गडकरी यांनी दिल्ली भेटीत लातूर-बार्शी रस्त्याचे काम लवकरच टप्याटप्याने करण्यात येईल असे सांगीतले होते. त्यानुसार या रस्त्याचे पहिल्या टप्यातील लातूर विमानतळ चौक ते मुरूड अकोला दरम्यानचा कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाल्याने दिलेला शब्द पाळल्याबद्दल त्यांचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी जाहीर आभार व्यक्त करून सदर रस्त्याचे उर्वरीत सर्व काम लवकरच पुर्ण होवून जनतेची गैरसोय दूर होईल असे बोलून दाखविले.
लातूर ते बार्शी या रस्त्यावरून मुंबई पुणे व अन्य ठिकाणी जाणाऱ्या वाहनाची सतत मोठी गर्दी असते. अरूंद रस्त्यामुळे या रस्त्यावर अनेकवेळा अपघात झाले, अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या रस्त्याबाबत राज्यशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही गेली अनेक वर्षापासून या लातूर-बार्शी रस्त्याचे काम होत नव्हते. गेल्या ३ ऑगस्ट २०२१ रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्यासह भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, जिपचे अध्यक्ष राहूल केंद्रे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक केंद्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बापुराव राठोड आदींच्या शिष्टमंडळाने केंद्रीय वाहतूकमंत्री नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेवून लातूर-बार्शी या रस्त्यासह विविध रस्त्याची कामे व्हावीत अशी मागणी करून सविस्तर चर्चा केली.
यावेळी नितीनजी गडकरी यांनी लातूर ते बार्शी या रस्त्याचे काम लवकरच टप्याटप्याने पुर्ण करण्यात येईल असे शिष्टमंडळास बोलून दाखविले होते. त्यानुसार सदरील लातूर-बार्शी या रस्त्याचे पहील्या टप्यातील लातूर विमानतळ चौक ते मुरूड अकोला दरम्यानच्या कामाला दोन दिवसापुर्वीच सुरूवात झाली आहे. सदर कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाल्याने दिलेला शब्द पाळल्याबद्दल केंद्रीय वाहतूकमंत्री नितीनजी गडकरी यांचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी जाहीर आभार व्यक्त केले आहे. विमानतळ ते महिला तंत्रनिकेतन आणि मुरूड अकोला ते करकट्टा या रस्त्याचेही काम तात्कळ सुरू करण्यात यावे अशी मागणी दिल्ली भेटीतच गडकरी यांना एका निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार याही टप्यातील कामास लवकरच सुरू होणार आहे. लातूर ते बार्शी हा संपुर्ण रस्ता लवकरच पुर्ण होवून जनतेची होणारी गैरसोय दूर होईल असे आ. रमेशअप्पा कराड यांनी सांगीतले.