चारही नगरपंचायती भाजपाच्या ताब्यात ठेवण्यासाठी जिद्दीने कामाला लागावे – आ. रमेशअप्पा कराड
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हयातील चाकूर, देवणी, शिरूर अनंतपाळ आणि जळकोट येथील नगर पंचायतीसाठी येत्या २१ डिसेंबर २०२१ रोजी निवडणुक होत असून भाजपाच्या ताब्यात असलेल्या या चारही नगरपंचायतीवर पुन्हा भाजपाचा झेंडा फडकलाच पाहिजे यासाठी सर्व लोकप्रतिनीधी आणि पक्ष पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेवून जिद्दीने काम करावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी एका बैठकीत बोलताना केले.
जिल्हयातील नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने चारही नगर पंचायतीतील प्रमुख भाजपा पदाधिकारी आणि लोकप्रतिनीधींची बैठक शनिवारी जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने गोरगरीब सर्वसामान्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या त्याचा लाभ असंख्य लाभार्थ्यांना मिळाल्याने देशभरात समाधानाचे आणि सहानुभूतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याने या सरकारवर जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचे आ. कराड यांनी बोलून दाखविले.
जगातील सर्वात मोठया पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत ही अभिमानाची बाब आहे. चारही नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मोठया प्रमाणात विकासाची कामे झाली आहेत झालेली कामे मतदारांपर्यंत पोहंचवावीत. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या अनेक योजनांचा लाभ अनेक गरजूंना मिळाला त्यांना त्याची जाणीव करून द्यावी आणि भाजपाच्या ताब्यात असलेल्या चारही नगरपंचायती पुन्हा भाजपाच्याच ताब्यात राहील्या पाहीजे यासाठी भाजपाच्या पदाधिकारी, लोकप्रतिनीधी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी असेही आवाहन यावेळी आ. रमेशअप्पा कराड यांनी केले.
चार नगर पंचायतीसाठी पक्षाच्या वतीने निवडणुक प्रभारी म्हणून चाकूर- राहूल केंद्रे, शंकर रोडगे, देवणी- दगडू साळूंके, दिलीप मजगे, शिरूर अनंतपाळ- शैलेश गोजमगुंडे, किरण उटगे, जळकोट- संजय दोरवे, वसंत डिघोळे आणि धर्मपाल देवशेट्टे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे माहीती देवून इच्छुक उमेदवारांनी भाजपा जिल्हा कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर करावेत अशी सुचना आ. कराड यांनी याबैठीत केली.
या बैठकीस गणेशदादा हाके, शिवाजी बैनगिरे, रोहीदास वाघमारे, मंगेश पाटील, ज्ञानेश्वर चेवले, ऋषीकेश बद्दे, गणेश धुमाळ, गणेश सलगरे, काशिनाथ गरीबे, दिलीप मजगे, मनोहर पटणे, अट्टल धनुरे, वैजनाथ अष्टुरे, मच्छिंद्र नरवडे, अमर पाटील, नितीन रेड्डी, अरविंद नागरगोजे, सोमेश्वर सोप्पा, किशन धुळशेट्टे, बालाजी केंद्रे, दत्ता वाझे, प्रशांत बिबराळे यांच्यासह चाकूर, देवणी, शिरूर अनंतपाळ आणि जळकोट या नगर पंचायत कार्यक्षेत्रातील भाजपाचे लोकप्रतिनीधी, पक्ष पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते बैठकीस मोठया संख्येने उपस्थित होते.