उदगीर (एल पी उगीले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने मोठ्या कौशल्याने १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे दोन संशयित आरोपी ताब्यात घेऊन; ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
उदगीर शहरातील नवा मोंढा परिसरात चौधरी ट्रेडर्सच्या मालकाला कत्ती व स्प्रेचा धाक दाखवून रोख रक्कम असलेली बॅग घेऊन गेल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने कसून तपास करून छडा लावला आहे. या कारवाईत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून ३२ हजार रुपये रोख रक्कम, बॅग व संबंधित साहित्य तसेच चोरीची मोटारसायकल असा एकूण ८७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस स्टेशन उदगीर शहर येथे गुन्हा रजि. नं. ३७८/२०२६, कलम ३०९(४), ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्यात आला.गुन्ह्याच्या पद्धतीशी साधर्म्य असलेल्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तसेच अशा प्रकारचे गुन्हे करण्याची शक्यता असलेल्या संशयित व्यक्तींची माहिती संकलित करण्यात आली. त्याचबरोबर गोपनीय बातमीदारांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीची पडताळणी व विश्लेषण करण्यात आले. गुन्ह्याच्या तपासात १०० पेक्षा अधिक ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज व उपलब्ध डेटा हस्तगत करून त्याचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. आरोपींच्या हालचाली, गुन्ह्याच्या वेळेतील संभाव्य मार्ग, वाहनाची माहिती तसेच उपलब्ध तांत्रिक बाबींचा परस्पर संबंध तपासण्यात आला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित व्यक्तींची ओळख व त्यांच्या हालचालींची पडताळणी करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांतील संशयितांचा शोध घेत असताना येरोळमोड परिसरात होते. त्यावेळी मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे उदगीर–नळेगाव रोडवरील करडखेल पाटी, येथील एका हॉटेलसमोर सापळा रचण्यात आला.मिळालेल्या माहितीच्या आधारे तेथे विना नंबर मोटारसायकलवर तपकिरी रंगाच्या बॅगसह थांबलेल्या दोन इसमांना पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे विजय शिवाजी बारहाळे (वय २४ वर्षे, रा. हाळणी, ता. मुखेड, जि. नांदेड),गोविंद राजेंद्र अटकळे (वय २१ वर्षे, रा. हाळणी, ता. मुखेड, जि. नांदेड, ह.मु. चांदणी चौक, बावधान, पुणे) अशी निष्पन्न झाली. ताब्यात घेतलेल्या दोघांच्या ताब्यातील तपकिरी रंगाच्या बॅगची पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये ३२ हजार रुपये रोख रक्कम, दुकानाच्या हिशोबाच्या वह्या व इतर साहित्य मिळून आले. सदर मुद्देमालाची पडताळणी केली असता तो उदगीर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालमत्तेशी संबंधित असल्याचे तपासात प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. तपासादरम्यान उपलब्ध माहितीच्या आधारे दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री नवा मोंढा, उदगीर येथील चौधरी ट्रेडर्सच्या मालकास कत्ती व स्प्रेचा धाक दाखवून रोख रक्कम असलेली बॅग घेऊन गेल्याच्या घटनेशी सदर आरोपींचा संबंध असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.
आरोपींच्या ताब्यात आढळून आलेल्या विना नंबर हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकलचा पुढील तपास केला असता सदर वाहन चोरीचे असल्याचे अभिलेखाच्या पडताळणीत निष्पन्न झाले. याबाबत पोलीस स्टेशन मुक्रमाबाद, जि. नांदेड येथे गुन्हा रजि. नं. १२८/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदर कारवाईमध्ये आरोपींच्या ताब्यातून ३२,००० रुपये रोख रक्कम , तपकिरी रंगाची बॅग व संबंधित साहित्य,हिरो स्प्लेंडर प्लस विना नंबर मोटारसायकल असा एकूण ८७,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे.
सदर दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन उदगीर शहर येथे हजर करण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार संजय कांबळे, तुळशीराम बरुरे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, युवराज गिरी, आनंद हल्लाळे, गोविंद येलमटे, पाराजी पुठ्ठेवाड, गणेश साठे, श्रीनिवास जाभळे, शैलेश सुडे, हरी पतंगे, यांनी केली आहे.
१०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास, संशयित गुन्हेगारांची माहिती संकलन आणि गोपनीय बातमीदारांकडून प्राप्त माहितीची पडताळणी अशा बहुआयामी तपासातून गुन्ह्याचा माग काढण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. अधिकृत कोणती माहिती नसताना सुतावरून स्वर्ग गाठत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शोध लावल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.













Responses (0 )