Police Flash News

एखाद्या पदाधिकाऱ्याच्या आग्रहामुळे संपूर्ण गणेश मंडळाला अडचणीत आणू नका – पोलीस अधीक्षक अमोल तांबे

0
292
एखाद्या पदाधिकाऱ्याच्या आग्रहामुळे संपूर्ण गणेश मंडळाला अडचणीत आणू नका – पोलीस अधीक्षक अमोल तांबे

लातूर (एल पी उगिीले) गणेश मंडळाच्या एखाद्या पदाधिकाऱ्यांच्या ग्राहका तर पारंपारिक वाद्य सोडून डॉल्बी चा आग्रह धरला तर सर्व पदाधिकाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. सामाजिक जाणीव विचारात घेऊन असा अनावश्यक आग्रह कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी करू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.

गणेशोत्सव हा आनंद, भक्ती, सामाजिक एकोपा आणि शांततेचा उत्सव आहे. त्यामुळे एखाद्या गणेश मंडळातील एका पदाधिकाऱ्याच्या डॉल्बी लावण्याच्या आग्रहामुळे संपूर्ण गणेश मंडळाला कायदेशीर अडचणीत आणू नका, असे नम्र आवाहन लातूर पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून शांतता, सुव्यवस्था आणि ध्वनीप्रदूषणमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उदगीर येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सव पारंपरिक आणि शांततेच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

‘नो डीजे, नो डॉल्बी’ला मंडळांनी सहकार्य करावे

गणेशोत्सवामध्ये डीजे, डॉल्बी व कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांच्या साथीने उत्सव साजरा करण्यावर लातूर पोलीस विभागाचा भर आहे. लेझीम, ढोल-ताशा, झांज पथक यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सवाचा आनंद घेता येतो, आणि त्यातून आपल्या संस्कृतीचेही जतन होते.

ध्वनीप्रदूषणाचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती तसेच गर्भवती महिलांवर होऊ शकतो. त्यामुळे उत्सव साजरा करताना आपला आनंद इतरांसाठी त्रासदायक ठरणार नाही, याची प्रत्येक गणेश मंडळाने काळजी घ्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

गेल्यावर्षीही पोलिसांनी केले होते आवाहन

गेल्या वर्षीही लातूर पोलीस विभागाने गणेश विसर्जन आणि उत्सव ध्वनीप्रदूषणमुक्त वातावरणात पार पाडण्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी जिल्ह्यातील बहुतांश गणेश मंडळांनी पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य केले होते.

मात्र, पोलिसांनी केलेल्या विनंतीवजा सूचना आणि आवाहनाकडे दुर्लक्ष करून डॉल्बी अथवा नियमबाह्य ध्वनिव्यवस्थेचा वापर करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. अशा प्रकरणांमध्ये ३० हून अधिक खटले न्यायालयात दाखल करण्यात आले असून संबंधितांना आता कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे.

एका पदाधिकाऱ्याच्या निर्णयाचा फटका संपूर्ण मंडळाला

गणेश मंडळामध्ये डॉल्बी लावण्याचा आग्रह एखाद्या एक-दोन पदाधिकाऱ्यांकडून होत असेल, तर केवळ त्यांच्या आग्रहापोटी संपूर्ण मंडळाला कायदेशीर अडचणीत आणू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

डॉल्बी लावण्याचा निर्णय घेतल्यास कारवाई केवळ संबंधित व्यक्तीपुरती मर्यादित राहणार नसून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळाचे अध्यक्ष, सचिव तसेच जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, अशी भूमिका लातूर पोलीस विभागाने वेळोवेळी स्पष्ट केली आहे.

त्यामुळे मंडळाच्या बैठकीतच सर्व पदाधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट निर्णय घ्यावा. एखाद्या पदाधिकाऱ्याच्या वैयक्तिक आग्रहाला बळी पडून संपूर्ण मंडळाचे पदाधिकारी कायदेशीर अडचणीत येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

डॉल्बी वापरणाऱ्यांवर यापूर्वीही कारवाई

गणेशोत्सवाबरोबरच विविध जयंती, मिरवणुका आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नियमांचे उल्लंघन करून डॉल्बी अथवा कर्णकर्कश ध्वनिव्यवस्थेचा वापर करणाऱ्यांवर लातूर पोलिसांनी यापूर्वीही कायदेशीर कारवाई केली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांची भूमिका ही कोणत्याही गणेश मंडळाच्या उत्सवाला विरोध करण्याची नसून, गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि कायद्याच्या चौकटीत साजरा व्हावा, ही आहे. उत्सवाचा आनंद घेताना इतर नागरिकांच्या आरोग्याचा आणि शांततेचा विचार करणे हीदेखील सामाजिक जबाबदारी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मंडळांनी स्वतःहून नियमांचे पालन करावे

गणेश मंडळांनी डीजे आणि डॉल्बीचा आग्रह न धरता पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन कायद्याचे पालन करावे. एका व्यक्तीच्या आग्रहामुळे संपूर्ण मंडळाचे नाव खराब होऊ नये तसेच पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी मंडळांनी खबरदारी घ्यावी.

‘गणेशोत्सव हा भक्तीचा आणि आनंदाचा उत्सव आहे; तो कोणाच्याही त्रासाचे कारण बनू नये’, या भावनेतून लातूर जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लातूर पोलिसांचा ‘नो डीजे, नो डॉल्बी’ हा संदेश केवळ कायद्याच्या अंमलबजावणीपुरता मर्यादित नसून, ध्वनीप्रदूषणमुक्त, संस्कृती जपणारा आणि सर्व समाजघटकांना सहभागी करून घेणारा गणेशोत्सव साजरा करण्यासाठीचा प्रयत्न आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी पुढाकार घेऊन यंदाचा गणेशोत्सव पारंपरिक, शांततामय आणि ध्वनीप्रदूषणमुक्त पद्धतीने साजरा करावा, असे नम्र आवाहन लातूर पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )



















Related posts