उदगीर (एल. पी. उगीले) उदगीर शहरांमध्ये अल्पावधीत लोकप्रियतेचे शिखर गाठणारे बिरादार नेत्र रुग्णालय व फेको सेंटरचे प्रमुख डॉ. सुदाम बिरादार म्हणजे गोरगरिबाचे कैवारी आहेत. सामाजिक जाण जपणारे उच्च विद्या विभूषित नेत्ररोग तज्ञ म्हणून ते आज ओळखले जात आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक तज्ञ आहेत, मात्र सामाजिक जाणीव जपून खऱ्या अर्थाने समाजातील तळागाळामध्ये असलेल्या गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे काम करावे. या उदात्य हेतूने काम करणाऱ्या डॉक्टरांची संख्या अत्यंत कमी आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही. डॉ. सुदाम बिरादार हे बरेच वर्ष लायन्स नेत्र रुग्णालयामध्ये प्रमुख नेत्रतज्ञ म्हणून काम करत होते. त्या ठिकाणची सामाजिक जाणीव त्यांनी कायम जपली असून आपल्या खाजगी रुग्णालयामधून देखील आपल्या परिसरातील जनतेचे हित कसे जपता येईल, ही दूरदृष्टी ठेवून गोरगरिबांसाठी मोफत नेत्ररोग निदान व अल्प दरामध्ये नेत्र शस्त्रक्रिया शिबिर हा उपक्रम त्यांनी राबवून खऱ्या अर्थाने सामाजिक जाणीव जपली आहे. असे विचार ज्येष्ठ समाजसेवक तथा निडेबन गावाचे भाग्यविधाते उमाकांतराव तपसाळे यांनी व्यक्त केले. ते स्व. रुपेश शिंदे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्ररोग निदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुखातिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी निडेबन गावाचे माजी सरपंच रणजीत पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते योगेश शिंदे हेही उपस्थित होते. या मोफत नेत्ररोग निदान शिबिराला उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
निडेबन येथील लिंकन पब्लिक स्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये 203 नेत्र रुग्णांनी नेत्र तपासणी करून घेतली. तर यापैकी 22 नेत्र रुग्णांसाठी अल्प दरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच बिरादार नेत्र रुग्णालयाच्या वतीने 15 नेत्र रुग्णांना अर्थात ज्यांना जवळचे कमी दिसते, अशा रुग्णांसाठी मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पुढे बोलताना उमाकांतराव तपसाळे यांनी गेल्या अनेक वर्षापासून निडेबन गावाकडे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्यामुळे गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, नाहीतर स्वच्छतेचा प्रश्न असेल ऐरणीवर आला आहे. लवकरच ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत. त्यामुळे नागरिकांनी गावाच्या विकासाच्या प्रश्नांची ज्यांना जाण आहे, अशाच लोकांच्या हातामध्ये सत्ता द्यावी. जेणेकरून आपण त्यांना जाब विचारू शकू, असे सांगितले.
याप्रसंगी समाजसेवक योगेश शिंदे यांनी संयोजन समितीच्या वतीने या शिबिरासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, त्या सर्वांचे आभार व्यक्त केले. निडेबन च्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे रणजीत पाटील यांनी कार्यक्रमानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
निडेबन गावामध्ये एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर संपन्न झाले. त्यापैकी कल्पना टॉकीज जवळ झालेल्या शिबिरामध्ये 55 नेत्र रुग्णांनी नेत्र तपासणी करून घेतली.
डॉ. सुदाम बिरादार यांच्या बिरादार नेत्र रुग्णालय व फेको सेंटरच्या वतीने एकाच दिवशी दोन ठिकाणी वेगवेगळी शिबिरे घेऊन ती यशस्वी करून दाखवली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुदाम बिरादार आणि त्यांचे सहकारी शेखर पाटील, गणेश जोगदंड, महेश काळोजी, माधव पाटील, प्रतीक पांडेकर, विक्रम भंडे यांनी मेहनत घेतली. गावातील सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टीने हे शिबीर अत्यंत महत्त्वाचे ठरले असून अशाच पद्धतीने लोकांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना भविष्यात गावात राबवण्यात येतील, अशी ही माहिती रणजीत पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
........
सामाजिक जाणीवा जपण्याचा माझा छोटासा प्रयत्न - डॉ. सुदाम बिरादार
वैद्यकीय क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी आर्थिक फायदा असला तरी आपल्या भागातील सर्वसामान्य गोरगरिबांचे अश्रू पुसता यावेत, आपल्या जनतेची सेवा करावी. अशी आपल्या आई-वडिलांची इच्छा असल्यामुळे आपण पुन्या मुंबई ऐवजी उदगीर शहराला कर्मभूमी बनवली आहे. या भागातील जनतेचे प्रश्न आपल्याला माहिती आहेत. या भागातील जनतेचे दारिद्र्य आपल्याला माहिती आहे. त्यामुळे गरिबांना योग्य दर्जाची परंतु त्यांना परवडेल अशा पद्धतीची सेवा देण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे विचार बिरादार नेत्र रुग्णालय व फेको सेंटरचे प्रमुख डॉ. सुदाम बिरादार यांनी व्यक्त केले.













Responses (0 )