Police Flash News

उदगीर शहरात वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याची मागणी, मोठ्या आवाजाच्या बुलेट, फटाके व ऑटोवरील नियमबाह्य हॉर्न-साऊंड सिस्टिमवर कारवाईची मागणी

0
1
उदगीर शहरात वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याची मागणी,

मोठ्या आवाजाच्या बुलेट, फटाके व ऑटोवरील नियमबाह्य हॉर्न-साऊंड सिस्टिमवर कारवाईची मागणी

उदगीर (एल पी उगीले ) : उदगीर शहरात वाढत असलेल्या ध्वनी प्रदूषणासह काही वाहनांमध्ये करण्यात येणाऱ्या नियमबाह्य बदलांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी जन परिवर्तन सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अझरोद्दीन शेख यांनी केली आहे.

उदगीर शहरातील विविध भागांत काही वाहनचालकांकडून मोठ्या आवाजाच्या बुलेटचा वापर केला जात असून, वाहनांमध्ये मोठ्या आवाजाचे सायलेंसर लावून कर्णकर्कश आवाज केला जात असल्याचे आढळून आले आहे. तसेच रस्त्यावर अनावश्यकपणे फटाके फोडल्यामुळेही नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

यासोबतच काही ऑटो रिक्षांवर मोठ्या आवाजाचे हॉर्न तसेच साऊंड सिस्टिम बसविण्यात आले आहेत. काही ऑटोच्या समोरील भागात मोठमोठे नामफलक, सजावटीचे साहित्य किंवा इतर वस्तू लावण्यात आल्याने चालकाच्या दृष्टीक्षेपात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासी तसेच इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

काही वाहनांवर मोठे आरसे, अतिरिक्त साईड ग्लास तसेच वाहनाच्या मूळ रचनेत बदल करणारे विविध साहित्य लावण्यात येत असल्याचेही आढळून आले आहे. वाहनांमध्ये अशा प्रकारचे बदल करून ती रस्त्यावर चालविली जात असल्यास संबंधित विभागाने त्यांची तपासणी करून नियमांनुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोठ्या आवाजाच्या बुलेट, हॉर्न, साऊंड सिस्टिम आणि फटाक्यांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील शांततापूर्ण वातावरणावरही याचा परिणाम होत आहे. विशेषतः शाळा, रुग्णालये, धार्मिक स्थळे आणि रहिवासी भागांमध्ये अनावश्यक ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे अझरोद्दीन शेख यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात उदगीर शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यांनी याबाबत निदर्शनास आणून दिले असून, शहरातील मोठ्या आवाजाच्या बुलेट, फटाके, ऑटोवरील मोठे हॉर्न व साऊंड सिस्टिम तसेच वाहनांमध्ये करण्यात आलेल्या नियमबाह्य बदलांची तपासणी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

उदगीर शहरातील नागरिकांना सुरक्षित, शांततापूर्ण आणि ध्वनी प्रदूषणमुक्त वातावरण मिळावे यासाठी पोलीस प्रशासन व संबंधित वाहतूक विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षाही अझरोद्दीन शेख यांनी व्यक्त केली आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts