लातूर (एल पी उगीले) नवरात्रोत्सवा निमित्त तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी लातूर जिल्ह्यातून हजारो भाविक पायी प्रवास करतात. रात्रीच्या अंधारात महामार्गावरून पायी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून लातूर जिल्हा पोलीस दलाने विशेष उपाययोजना हाती घेतली आहे. भाविकांच्या अंगावरील जॅकेट, पाठीवरील सॅक तसेच पाण्याच्या बाटल्यांवर रिफ्लेक्टर लावून त्यांचा रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याचा स्तुत्य उपक्रम शहर वाहतूक शाखा, लातूर यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.
नवरात्रोत्सवादरम्यान तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ असते. भाविक रात्रंदिवस पायी प्रवास करत असताना महामार्गावरून वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारामुळे पायी चालणारे भाविक वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
खोपेगाव अन्नछत्र येथे २४ तास पोलीस तैनात
शहर वाहतूक शाखा, लातूर यांच्या वतीने खोपेगाव अन्नछत्र येथे विशेष पोलीस पॉइंट सुरू करण्यात आला आहे. दसरा सण संपेपर्यंत या ठिकाणी २४ तास पोलीस अंमलदार आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांच्या जॅकेट, सॅक आणि पाण्याच्या बाटल्यांवर रिफ्लेक्टर लावण्यात येत आहेत.
वाहनांच्या प्रकाशझोतात हे रिफ्लेक्टर चमकल्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरून पायी जाणारे भाविक दूरवरूनच दिसू शकतात. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होणार असून भाविकांना सुरक्षितपणे तुळजापूरपर्यंत पोहोचता येईल, असा या उपक्रमामागील उद्देश आहे.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अधीक्षकांकडून दैनंदिन आढावा
नवरात्रोत्सव संपेपर्यंत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम चोवीस तास सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्याच्या हद्दीतून तुळजापूरकडे पायी जाणारा कोणताही भाविक रिफ्लेक्टरशिवाय प्रवास करणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी शहर वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदारांना दिल्या आहेत. या उपक्रमाचा दैनंदिन आढावाही घेतला जात आहे.
रस्ते अपघातांमध्ये कोणाचाही जीव जाऊ नये, ही लातूर पोलीस दलाची भूमिका असून, दुचाकीस्वारांच्या हेल्मेट वापराबाबतही सातत्याने जनजागृती आणि आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्याच धर्तीवर नवरात्रोत्सवात पायी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे.
भाविकांनीही वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे
लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व भाविकांना पायी प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महामार्गावरून चालताना रस्त्याच्या डाव्या बाजूने, शक्य तितक्या सुरक्षित कडेने चालावे. रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर असलेले जॅकेट किंवा साहित्य वापरावे. रस्त्यावर एकाच ठिकाणी मोठी गर्दी करू नये, तर शक्यतो शिस्तबद्ध पद्धतीने एकामागे एक चालावे.
रस्ता ओलांडण्यापूर्वी दोन्ही बाजूंनी वाहने येत नसल्याची खात्री करावी आणि त्यानंतरच रस्ता ओलांडावा. वाहनचालकांनाही पायी जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वेग नियंत्रित ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
भाविकांची श्रद्धा आणि त्यांच्या जीविताची सुरक्षा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या मानून लातूर पोलिसांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. सुरक्षित प्रवास करा, वाहतुकीचे नियम पाळा आणि श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन सुरक्षितपणे घ्या, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.














Responses (0 )