औराद हद्दीतील २१ वर्षीय तरुणाचा हेल्मेट न वापरल्याने दुर्दैवी मृत्यू , आत्ता तरी लातूरकर हेल्मेट चे महत्व समजून घेतील का ? अमोल तांबे यांची विनंती
लातूर (एल पी उगीले) लातूर पोलिसांच्या सूचनेनुसार हेल्मेट घेतली खरी, मात्र ती डोक्यावर न वापरता गाडीला अडकवून फिरण्याची फॅशन सुरू झाली आहे. हे चुकीचे आहे. असे वेळोवेळी पोलिसांनी सांगून देखील पुन्हा एकद तरुणांने हेल्मेट जवळ असूनही ते डोक्यावर न घातल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणाला दुर्दैवीपणे आपला जीव गमवावा लागल्याची घटना औराद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने पुन्हा एकदा दुचाकीस्वारांच्या हेल्मेट वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून, “लातूरकरांना हेल्मेटचे महत्त्व कधी समजेल?” असा सवाल लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी व्यक्त केला आहे.
सदर तरुण दुचाकीवरून प्रवास करत असताना त्याच्याकडे हेल्मेट होते. मात्र त्याने हेल्मेट डोक्यावर न घालता ते दुचाकीच्या हँडलला अडकवून ठेवले होते. प्रवासादरम्यान झालेल्या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हेल्मेट जवळ होते, मात्र त्याचा वापर केला गेला नाही, ही बाब या घटनेतील सर्वांत वेदनादायी बाब ठरली आहे.
या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी हेल्मेट वापराबाबत सुरू असलेल्या जनजागृतीच्या प्रयत्नांचा आढावा घेत नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली.
लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट वापराबाबत सातत्याने विविध स्तरांवर जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात येत असून, त्यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. रस्त्यांवर हेल्मेट वापराबाबत जनजागृती करणारे फलक लावण्यात आले आहेत. अपघातग्रस्त व क्षतिग्रस्त वाहनांचे देखावे उभारून नागरिकांना अपघाताची भीषणता समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच गणेश मंडळांच्या माध्यमातूनही हेल्मेट वापराबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली आहे.
एवढे प्रयत्न करूनही दुचाकीस्वारांकडून हेल्मेट वापराबाबत अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी खंत व्यक्त केली.
‘तो आज जिवंत असता...’
या दुर्दैवी घटनेबाबत बोलताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अत्यंत कळकळीने सांगितले की, एखाद्या कुटुंबातील २१ वर्षांचा तरुण अपघातात गमावणे ही त्या कुटुंबाची कधीही भरून न निघणारी हानी आहे. हेल्मेट त्याच्यासोबत होते; मात्र ते डोक्यावर घातले गेले नाही. जर त्याने हेल्मेटचा वापर केला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता आणि आज तो आपल्या कुटुंबाचा आधार बनून उभा असता.
एका क्षणाची निष्काळजीपणा संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभराचे दुःख देऊ शकतो. त्यामुळे या घटनेकडे केवळ अपघात म्हणून न पाहता, प्रत्येक दुचाकीस्वाराने यातून धडा घेण्याची गरज आहे.
‘हेल्मेट स्वतः वापरा, इतरांनाही वापरायला सांगा’
प्रत्येक नागरिकाने दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेटचा वापर करावा. केवळ स्वतः हेल्मेट घालणे पुरेसे नाही, तर आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि परिचित यांनाही हेल्मेटचे महत्त्व सांगावे. आपल्या एका आग्रहामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, असा संदेश पोलीस अधीक्षकांनी दिला.
हेल्मेट हे पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठीचे साधन नसून अपघाताच्या वेळी स्वतःच्या जीवाचे संरक्षण करणारे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे दंडाची भीती म्हणून नव्हे, तर आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने हेल्मेट वापरणे आवश्यक आहे.
“आपण घरी परत येण्याची वाट आपले कुटुंबीय पाहत आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रवास हेल्मेटसहच करा,” असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.













Responses (0 )