Police Flash News

दुष्काळात स्मार्ट मीटरची सक्ती बंद करा!” — डॉ. नरसिंह भिकाने यांची मागणी

0
17
दुष्काळात स्मार्ट मीटरची सक्ती बंद करा!” — डॉ. नरसिंह भिकाने यांची मागणी

“

निलंगा (एल पी उगीले) : दुष्काळामुळे शेतकरी आणि सामान्य जनता आर्थिक संकटात सापडलेली असताना, महावितरणकडून निलंगा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांनी केला आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, अशी मागणी त्यांनी महावितरणच्या अभियंत्यांकडे केली आहे.

महावितरणच्या अभियंत्यांना सवाल करताना डॉ. भिकाने म्हणाले की, “अदानी एनर्जी सोल्युशन्सला स्मार्ट मीटर निर्मिती आणि बसविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कंत्राटे देऊन संपूर्ण ऊर्जा क्षेत्र अदानी समूहाच्या फायद्यासाठी चालवले जात आहे काय?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

देशभरातील स्मार्ट मीटरच्या कंत्राटांमध्ये अदानी समूहाचा मोठा वाटा असल्याचा दावा डॉ. भिकाने यांनी केला. महाराष्ट्रातील विविध विभागांसाठीही हजारो कोटी रुपयांची कंत्राटे दिल्याचे सांगत, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून देशभरात मोठ्या आर्थिक उलाढालीला चालना मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

“वर्षानुवर्षे वापरात असलेले जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्याची गरज काय? दुष्काळात जनता दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत असताना ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकणारी व्यवस्था का लादली जात आहे?” असा सवाल डॉ. भिकाने यांनी केला.

स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होत असल्याचा दावा करत त्यांनी ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध केला. वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या नियमांपासून ते स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेपर्यंत ग्राहकांच्या अधिकारांचा विचार केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

दुष्काळाच्या काळात शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत स्मार्ट मीटरची सक्ती करून नागरिकांना आणखी आर्थिक संकटात ढकलू नये. दुष्काळी परिस्थिती संपेपर्यंत स्मार्ट मीटरची सक्ती स्थगित करावी, अशी मागणी डॉ. भिकाने यांनी केली.

“जनतेची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली आणि दुष्काळात ग्राहकांना वेठीस धरले, तर मनसे स्वस्थ बसणार नाही. जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून मनसेच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल,” असा सज्जड इशारा डॉ. नरसिंह भिकाने यांनी महावितरणला दिला.

यावेळी जिल्हा सचिव प्रदीप शेळके, जिल्हाउपाध्यक्ष सूरज पटेल, तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार, शहराध्यक्ष अबू बकर सय्यद, तालुकासचिव गणेश उसनाळे, तालुकाउपाध्यक्ष बालाजी पवार, विकास सूर्यवंशी, सदाशिव हाडोळे, शिवराज चिंचोले यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts