Police Flash News

पानंद रस्त्याच्या वादातून दुहेरी खून; पाच आरोपींना जन्मठेप.

0
10
पानंद रस्त्याच्या वादातून दुहेरी खून; पाच आरोपींना जन्मठेप.

लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे डांगेवाडी येथे पानंद रस्त्याच्या कारणावरून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात दोघांचा मृत्यू व चौघे जखमी झालेल्या प्रकरणात निलंगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच आरोपींना जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सत्र खटला क्र. 02/2020 मध्ये सुनावण्यात आला.

दिनांक 3 ऑक्टोबर 2019 रोजी डांगेवाडी येथे पानंद रस्त्याच्या कारणावरून आरोपींनी शेतात काम करीत असलेल्या सुभाष दयानंद सुडे, दयानंद नामदेव सुडे व इतरांवर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात सुभाष दयानंद सुडे व दयानंद नामदेव सुडे यांचा मृत्यू, तर अन्य चार जण जखमी झाले होते.

याप्रकरणी मयत सुभाष सुडे यांचा मुलगा नामदेव सुभाष सुडे यांच्या फिर्यादीवरून शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. 150/2019, कलम 302, 307, 148, 147, 143, 504 सह 149 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक परमेश्वर बी. बदम यांनी करून प्रत्यक्षदर्शी व जखमी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे तसेच जप्ती पंचनाम्यांसह उपलब्ध सबळ पुराव्यांच्या आधारे आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, प्रत्यक्षदर्शी व जखमी साक्षीदार तसेच जप्ती पंच यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. उपलब्ध साक्षी-पुराव्याच्या आधारे मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एस. बी. पवार, निलंगा यांनी आरोपींना दोषी धरून शिक्षा सुनावली.

ज्ञानोबा अंगद ओनामे,जगन्नाथ विश्वंभर ओनामे,राजकुमार विश्वंभर ओनामे, राम बाबुराव ओनामे,भागवत बाबुराव ओनामे. (सर्व रा. डांगेवाडी, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर).

वरील पाचही आरोपींना कलम 302 सह 149 भादंवि अन्वये जन्मठेप व प्रत्येकी 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावास; कलम 307 सह 149 भादंवि अन्वये 5 वर्षे कारावास व प्रत्येकी 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त कारावास; तसेच कलम 148 भादंवि अन्वये 3 वर्षे, कलम 147 भादंवि अन्वये 2 वर्षे आणि कलम 143 भादंवि अन्वये 6 महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता कपिल व्ही. पंढरीकर, निलंगा यांनी बाजू मांडली. त्यांना जिल्हा सरकारी अभियोक्ता एस. व्ही. देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ॲड. सी. जे. सबनीस - पाटील यांनी सहाय्य केले. कार्यालयीन कामकाजासाठी एच. जी. बिरादार (कनिष्ठ लिपिक) तसेच कोर्ट पैरवी कर्मचारी सौ. ए. जी. कांबळे यांनी सहकार्य केले.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts