उदगीर (एल पी उगिले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड वाङ्मय मंडळाचे उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्मिता नागोरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, अॅड. प्रकाश तोंडारे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार, प्रा. डॉ. बी. एस. भुक्तरे, प्रा. डॉ. एस. एम. सूर्यवंशी, प्रा. डॉ. रमेश मुलगे आणि प्रा. डॉ. कुरेशी जैतून बानू यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रमेश मुलगे यांनी केले. आपल्या मार्गदर्शनात प्रा. डॉ. नागोरी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतः घडवले पाहिजे, अपयशासाठी इतरांना दोष देऊ नये. आणि जीवनातील ताण-तणावाचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. साहित्य हे मनुष्याला जीवनाची योग्य दिशा दाखवते, त्यामुळे त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवनंदा रोडगे यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. पुष्पलता काळे यांनी मानले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लेखन प्रेरणा दिन निबंध स्पर्धेचा निकालही यावेळी जाहीर करण्यात आला. वरिष्ठ महाविद्यालय विभागात मराठी विषयात एम.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी फड संतोष दत्ता याने प्रथम क्रमांक पटकावला, तर इंग्रजी विषयात बी.ए. द्वितीय वर्षाची शेख नुसरत हिला द्वितीय क्रमांक मिळाला. उर्दू विषयात बी.एस्सी. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी सय्यदा माहीन तलात लाईक साब हिने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच कन्नड आणि हिंदी विषयात तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला असून त्यात बी.एस्सी. द्वितीय वर्षाची तांबोळी स्नेहा शिवाजी हिने कन्नडसाठी आणि बी.एस्सी. तृतीय वर्षाची मुस्कान मौलासाब तांबोळी हिने हिंदीसाठी पारितोषिक पटकावले. कनिष्ठ महाविद्यालय विभागात इंग्रजी विषयात ११ वी विज्ञानची सय्यद अयेशा रब्बानी हिने प्रथम, मराठी विषयात ११ वी विज्ञानची स्वामी मैथिली मनमथ हिने द्वितीय तर उर्दू विषयात ११ वीचा सय्यद मुजम्मिल लायक साब याने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.














Responses (0 )