लातूर (एल पी उगीले) येथील दयानंद कला महाविद्यालय येथे विश्व कल्याण विचार मंच आणि रोटरी क्लब, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरा भारत, मेरा दायित्व’ या विषयावर युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत राष्ट्रप्रेम, संविधाननिष्ठा, सामाजिक जबाबदारी, नियमांचे पालन, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर आणि विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले की, भारत हा विविधतेने नटलेला देश असून विविध जाती, धर्म, भाषा आणि संस्कृतीचे लोक येथे एकोप्याने राहतात. जगाच्या पटलावर भारताचे एक वेगळे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थान आहे. अशा महान देशाचे नागरिक म्हणून आपल्या मनात देशाप्रती निष्ठा आणि जबाबदारीची भावना असणे आवश्यक आहे. देशाच्या प्रगतीमध्ये केवळ शासन किंवा प्रशासनाचीच भूमिका नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेने केलेल्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, मोठी लोकसंख्या असतानाही देशामध्ये विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची आणि आपल्या क्षमतेनुसार राष्ट्राच्या विकासात योगदान देण्याची गरज आहे. केवळ दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा एखादी सार्वजनिक समस्या निर्माण झाल्यानंतर ‘ती सोडवण्यासाठी मी काय करू शकतो?’ हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलीसांविषयीची धारणा स्वतःच्या अनुभवावर आधारित असावी
पोलीस विभागाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याच्या गरजेवरही पोलीस अधीक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लहान मुलांना शिस्त लावण्यासाठी अनेकदा ‘पोलीसांना फोन लावीन’ असे सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या मनात लहानपणापासूनच पोलीसांविषयी भीती किंवा नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. पोलीसांविषयी मत तयार करताना ते केवळ ऐकीव माहितीवर आधारित नसावे, तर स्वतःच्या अनुभवातून ते तयार झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
“पोलीसांशी ज्यांचा प्रत्यक्ष संबंध आलेला नाही, अशा व्यक्तींकडूनही अनेकदा पोलीसांविषयी ऐकीव किंवा चुकीची माहिती सांगितली जाते. ही धारणा बदलण्यासाठी पोलीस आणि नागरिकांमधील संवाद वाढणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
सोशल मीडियावरील माहितीची सत्यता तपासा
आजच्या काळात देशासमोरील आव्हानांचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी परकीय आक्रमणाचा धोका मोठा होता; मात्र आज अंतर्गत मतभेद, सामाजिक कलह आणि चुकीची माहिती हीदेखील गंभीर आव्हाने आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची किंवा अपूर्ण माहिती प्रसारित करून तरुणांना भडकवण्याचे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहणे, अफवांवर विश्वास न ठेवणे आणि अपूर्ण माहितीच्या आधारे कोणत्याही प्रकारचा सहभाग नोंदवू नये, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
युवाशक्ती हीच देशाची खरी शक्ती
युवाशक्ती ही भारताची सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाच्या काळात अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
“आई-वडील आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी मोठ्या कष्टाने पैसा खर्च करतात. त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या वयात अभ्यासाला प्राधान्य द्यावे. स्वतःच्या पायावर उभे राहून आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी आपल्या शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रवासाचाही विद्यार्थ्यांसमोर उल्लेख केला. ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनत केली तर यश मिळवता येते, असा संदेश त्यांनी दिला.
राज्यघटनेशी निष्ठा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी
कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिशेने बोलताना पोलीस अधीक्षकांनी विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेशी निष्ठा ठेवण्याचे आवाहन केले. देशाच्या कायद्यांचा आणि नियमांचा आदर करणे, सार्वजनिक शिस्त पाळणे, सामाजिक सलोखा जपणे आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपल्या क्षमतेनुसार योगदान देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
“देशाची प्रगती ही केवळ सरकारची जबाबदारी नसून देशातील प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. युवांनी आपले शिक्षण, कौशल्य, विचार आणि ऊर्जा देशाच्या विकासासाठी वापरली तर भारत अधिक सक्षम होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या युवा संवाद कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना राष्ट्राप्रती असलेले आपले कर्तव्य, सामाजिक जबाबदारी आणि भविष्यातील भूमिका याबाबत सकारात्मक दिशा मिळाली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे मार्गदर्शन ऐकले.














Responses (0 )