खरिपामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार खते आणि बियाणे वेळेवर आणि योग्य भावात उपलब्ध करून द्या – ना संजय बनसोडे
उदगीर (एल. पी. उगिले) : सध्या शेतकऱ्याची पेरणीसाठी घाई चालू आहे. एका बाजूला शेतीच्या मशागतीची तयारी तर दुसर्या बाजूला खते आणि बियाणे खरेदीसाठी धावपळ ,अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोणत्याही क्षणी मान्सून येऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे शेतकऱ्यांनी गती घेतली आहे. या गतीचा गैरफायदा व्यापार्यांनी घेऊ नये. शेतकऱ्यांना अत्यंत दर्जेदार खते आणि बियाणे उपलब्ध करून द्यावेत. अन्यथा व्यापार्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा महाराष्ट्राचे राज्यमंत्री ना. संजय भाऊ बनसोडे यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिला.
हवामान खात्याचा अंदाज आणि व कृ षी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे उदगीर तालुक्यातील शेतकरी पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. तालुक्यातील खरिपाचे एकूण क्षेत्र 63 हजार तीनशे हेक्टर असून त्यातील 44 हजार 570 हेक्टर वर सोयाबीनचा पेरा होत असतो. उदगीर तालुक्यातील शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून सोयाबीनच आहे. त्यामुळे खरिपामध्ये कृषीचे आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अवलंब करून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहनही याप्रसंगी ना. संजयभाऊ बनसोडे यांनी केले.
गेल्यावर्षी काही प्रमाणात बोगस बियाणे विकले गेल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गोची झाली. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला फसवणे म्हणजे अक्षरश: राष्ट्रद्रोह आहे. त्यामुळे कोणीही शेतकऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करू नये. शेतकऱ्यांना वेळेवर व दर्जेदार गुणवत्तापूर्ण बियाणे व रासायनिक खते उपलब्ध करून देणे याबाबत आवश्यक सूचना आपण कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत. तसेच निकृष्ट दर्जाची कृषी निविष्ठा तालुक्यात आढळून आल्यास संबंधित कंपनीवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्याबाबत आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
खरीप हंगामात मध्ये दर्जेदार कृषी निविष्ठांची साठवणूक होणार नाही, याकरिता भरारी पथकांची स्थापना करून तालुकास्तरावर 24तास तक्रार निवारण कक्षाची स्थापना करून शेतकऱ्यांच्या अडचणी वेळेत सोडवण्याच्या सूचनाही या प्रसंगी मंत्रिमहोदयांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनाकरिता युरिया, सिंगल सुपर फास्फेट! 20: 20: 0, 13 :18: 18, 10 :26 :26 या खताचा योग्य कृषी शास्त्रीय पद्धतीने वापर केल्यास डीएपी च्या वापरापेक्षा अधिक उत्पन्न मिळते, याबाबतचा प्रचार आणि प्रसार शेतकऱ्यांमध्ये करण्याच्या सूचना कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत.
दुबार पेरणीचे संकट टाळण्याकरिता तालुक्यात पेरणीयोग्य म्हणजेच सत्तर ते शंभर मी मी पाऊस झाल्यासच बियाणांची बीज प्रक्रिया उगवण क्षमता तपासून पेरणी करून शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न साधावे. असे आवाहनही याप्रसंगी ना. संजयभाऊ बनसोडे यांनी केलेले आहे. तसेच सर्व शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2022 करिता खते, बियाणे ,औषधे खरेदी ही परवाना धारक कृषी सेवा केंद्रातून करावी.
खते खरेदी करते वेळेस पाॅस मशीन मधील पावती घ्यावी. तसेच खताच्या गोणी वरील छापील किंमत पाहावी. कृषी केंद्र विक्रेता यांच्याकडील असलेला साठा व दर फलक पाहावा. बियाणे खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. व बियाणे पिशवी खालच्या बाजूने फोडावी व हंगाम संपेपर्यंत रिकामी पिशवी जपून ठेवावी. तपासणी केल्यानंतरच कोणतेही बियाणे पेरणीसाठी वापरावे. किमान 70 टक्के उगवण क्षमता असल्याची खात्री करावी. कीटकनाशके, तणनाशके पक्की पावती वरच खरेदी करावीत.
अधिकृत विक्रेते यांच्याकडून कोणतेही कृषी कृषी निविष्ठा खरेदी करू नयेत. अनधिकृतरित्या कोणी खते, बियाणे विक्री करत असल्याचे आढळून आल्यास नजीकच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून त्यांना माहिती द्यावी. जेणेकरून अशा पद्धतीची शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आणि बोगस खते, बियाणे विकणाऱ्या लोकांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करता येईल. असेही आवाहन याप्रसंगी ना. संजयभाऊ बनसोडे यांनी केले आहे. आपल्याला आपल्या मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची काळजी असून बळीराजाला कोणीही फसविण्याचा प्रयत्न करू नये, असेही आवाहन त्यांनी या प्रसंगी केले आहे.