शेतकऱ्यांनी शेती सोबतच शेतमालाची मार्केटिंग करावी – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
जिल्हयात शेत रस्ता अभियान राबविण्यात येणार
लातूर (प्रतिनिधी) : जिल्हयातील शेतकऱ्यांनी शेती सोबतच आपल्या शेतात उत्पादीत केलेल्या शेती मालाची मार्केटिंग करण्याची कला अवगत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट,कृषि निगडीत संस्था, कृषि उद्योजक व शेतकरी यांच्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या मार्गदर्शनासाठी एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या एक दिवसीय कार्यशाळेस विभागयीय कृषि सह संचालक अशोक जगताप, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक दत्तात्रय गावसाने, आत्माचे सहाय्यक प्रकल्प संचालक आर.एस.पाटील,ॲग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिलीप कुलकर्णी,जिल्हा उद्योग केंद्राचे पी.डी. हनभर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, आत्मा व पोकरा प्रकल्पा अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यशाळेत कृषि विभागाच्या विविध योजनेची आपणास माहिती मिळणार आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाबरोबरच आपल्या शेत मालास अधिक भाव येण्यासाठी शेतमालाची मार्केटिंग करण्याची कला अवगत करावी. जिल्हयात शेत रस्ता अभियान राबविले जाणार असून प्रारंभी अतिक्रमण नसलेल्या शेतरस्त्याची कामे केली जाणार आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती शेत रस्त्यासाठी ठराव घेऊन प्रस्ताव दाखल करतील असे त्यांनी सूचित केले.
जिल्हयातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती उद्योगाबरोबरच दुग्ध् व्यवसाय, कुक्कुटपालन अशा इतर व्यवसायाकडे अधिककल वाढविला पाहीजे. त्या बरोबरच शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी केले.यापूढे जिल्हयात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शेती व्यवसायाबाबत विविध योजणांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषि विभागाने तालुकास्तरावर मेळावे आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
विभागीय कृषि सहसंचालक श्री.जगताप म्हणाले की, जिल्हयातील शेतकऱ्यांनी या एक दिवसीय कार्यशाळेस मोठा प्रतिसाद दिला आहे. कृषि विभाग प्रत्येक तालुक्यात या सर्व शेती विषयक योजनेची माहिती शेतकऱ्यांना देणार आहे. जिल्हयात प्रत्येक तालुक्यात या योजनेसाठी नोडल ऑफिसर नेमलेला आहे. स्मार्ट योजने मध्ये लातूर जिल्हयाची नोंदणी राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, असे ही त्यांनी यावेळी नमूद केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी या कार्यशाळेचे प्रास्ताविक करुन या कार्यशाळेचे स्वरुप, गरज व काय करणार आहोत ते विशद करुन जिल्हयातील शेतकऱ्यांना एकाच वेळेस शेती मधील विविध शासकीय योजनांची माहिती व्हावी म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे नमुद केले.
प्रारंभी या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी पृथ्वीराज व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. या कार्यशाळेत शेती विषयक शासनाच्या विविध योजनेची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. हनबर, जिल्हा ॲग्रणी बँकचे व्यवस्थापक श्री.कुलकर्णी,आत्माचे प्रकल्प संचालक आर.एस. पाटील यांचे मार्गदर्शन झाले. या कार्यशाळेमध्ये जिल्हयातील शेतकरी उत्पादक, कंपनी चे पदाधिकारी, शेतकरी गट प्रमुख कृषि संस्था पदाधिकारी, कृषि उद्योजक अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.