गाव व देशाला समृध्द करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : कृषी विभागाने शेतकर्याला समृध्द करण्यासाठी पोखरा योजनेअंतर्गत 23 योजना सुरू केल्या. परंतु याबाबत म्हणावी तशी जनजागृती नसल्यामुळे केवळ बोटावर मोजण्याइतक्याच शेतकर्यांना याचा लाभ मिळालेला आहे. बहुतांश शेतकर्यांनी परंपरागत पध्दतीचा वापर केल्यामुळे उत्पन्नामध्ये म्हणावी तशी वाढ होत नाही. शेती किती करतोय यापेक्षा कशा पध्दतीने करतोय याला महत्त्व आहे. त्यामुळे यापुढील काळातही गाव व देशाला समृध्द करायचे असेल तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी, असे प्रतिपादन भाजपा नेते, कृषी अभ्यासक तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते स्मार्ट व्हिलेज कव्हा येथे कृषी विभाग पोखरा अंतर्गत विविध योजना माहिती व दिव्यांगासाठी कृत्रीम व सहायक उपकरणे वाटप कार्यक्रमात अध्यक्षीय समारोपात बोलत होते. यावेळी युवा नेते तथा भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, डोणे मशरूम अॅन्ड प्रोसेडींग कपंनीचे सर्वेसर्वा लक्ष्मणराव डोणे, शिक्षणतज्ज्ञ गोविंदराव घार, लातूरचे तालुका कृषी अधिकारी महेश क्षिरसागर, एम.एन.एस.बँकेचे तज्ज्ञ संचालक सुभाषअप्पा सुलगुडले, सुदाम रूकमे, तंटामुक्ती समीतीचे अध्यक्ष भागवत घार, प्रकल्प विशेष तज्ज्ञ एस.व्ही.मराठे, प्रकल्प सहायक खंदाडे, प्रकल्प विशेषज्ञ येलाले, कव्हा सोसायटीचे व्हा.चेअरमन बालाजी घार, सरपंच पद्मिनताई सोदले, उपसरंपच किशोर घार, ग्रामसेवक अनंत सुर्यवंशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, ग्रामस्थांनी शेती करताना शेतीला मत्स व्यवसाय, कुक्कुटपालन या व्यवसायाची जोड देण्याची गरज आहे. केंद्राने शेती व्यवसायाला चांगले बजेट दिलेले आहे. परंतु परंपरागत शेती सोडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. आपल्याकडे शेतीमध्ये ऊसाचे एकरी उत्पन्न 35 ते 50 टन येते तेच उत्पादन ब्राझीलमध्ये 200 ते 300 टनावर गेलेले आहे. सोयाबीनमधील एकरी 8 ते 10 क्विंटल उत्पन्न मिळते ते बाहेरच्या देशात 40 ते 50 क्विंटल उत्पन्न मिळते. कारण अमेरिका चीन ब्राझीलमध्ये शेतीवर आधारीत प्रक्रिया उद्योगाचे प्रमाण 90 टक्के आहे. त्यामुळे 10 रूपयाच्या वस्तूची 100 रूपयाला विक्री केली जाते. त्यामुळे या परंपरागत शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतकर्यांनी द्यावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्रारंभी पोखरा अंतर्गत येणार्या 23 योजनेची माहिती प्रकल्पविशेष तज्ज्ञ एस.व्ही.मराठे, प्रकल्प सहायक खंदाडे, प्रकल्पविशेषतज्ज्ञ येलाले यांनी उपस्थित शेतकर्यांना देऊन शेतकर्यांचे शंका निरासन केले. तसेच गावातील 11 दिव्यांगाना ग्रामपंचायतीतर्फे कृत्रिम व सहायक उपकरणांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार शिवशरण थंबा यांनी केले. यावेळी काकासाहेब घोडके, नेताजी मस्के, गोविंद सोदले, सदाशिव सारगे, रसुल पठाण, कांताप्पा पाठणकर, लायक पठाण, गोविंद शिंदे, सालार पठाण, पंडीत खंडागळे, सदाशिव सारगे, गोपाळ बनसुडे, सुरेश होळकर यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आदर्श ग्राम कव्ह्याचे नाव राज्यात अगे्रसर करू
नुतन ग्रामपंचायत पदाधिकार्यांचे अभिनंदन करून राजकारण हे निवडणूकीपुरते असते त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येऊन गावच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. मी पोपटराव पवारांचे हिवरेबाजार पाहिले, आण्णा हजारे यांची राळेगणसिध्दी पाहिले, भास्करराव पेरे पाटलांचे पाटोदा पहिले आणि धणराज पाटील यांचे धामणगावही पाहिले. त्यामुळे या गावांच्या धर्तीवर कव्ह्याचा चौफेर विकास करून कव्हा ग्रामस्थांचे स्वप्न साकार करू असेे मत भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केले.
युवकांनो स्वतः निर्भर होऊन उद्योगी बना
रेणापूर तालुक्यामध्ये मी स्वतः मशरूमची कंपनी काढून उद्योग उभारला आहे. या माध्यमातून दिडशे कर्मचार्यांच्या माध्यमातून सहा राज्यात मशरूमचा पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे सध्याच्या स्पर्धेच्या युगात तरूण पिढीने शासकीय योजनेवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर होऊन उद्योगी बनावे केवळ 10 हजाराच्या नोकरीवर समाधान न मानता आपली मानसिकता बदलून उद्योगामध्ये सक्रीय व्हावे यामुळे उद्योग क्षेत्रात येणार्या तरूणांना चांगली दिशा मिळून चांगले उत्पन्नही मिळेल आणि समाजातील लोक तुम्हाला सलाम करतील त्यामुळे युवकांनो स्वतः आत्मनिर्भर होऊन उद्योगी बना, असे आवाहन डोणे मशरूम कंपनीचे संचालक लक्ष्मणराव डोणे यांनी केले. शेतकर्यांना अधिकारी तुमच्या दारी या केंद्र शासनाने शेतकर्याला चांगले पॅकेज जाहीर केलेले आहे. शेतकर्यांसाठी पोखरा अंतर्गत अनेक योजना लागू केलेल्या आहेत. या योजनेचा सहजासहजी लाभ मिळणार आहे. परंतु बर्याच शेतकर्यांमध्ये याबाबत जागृती नाही. पंरतु आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी विभागाचे सर्व अधिकारी शेतकर्याच्या गावात येऊन सर्व योजनेची माहिती देत आहेत. एकीकडे विकासाची गंगा वाहत असताना दुसरीकडे कोरोणा महामारीचे संकट आलेले आहे. हे संकट लवकरात लवकर टळो अशी याचना महादेवाकडे व्यक्त करीत अशा संकटातही कृषी विभागाने विविध योजना आपल्या दारी आणलेल्या आहेत. या योजनाची शेतकर्यांनी निष्ठेने अंमलबजावनी केली तर शेतकर्यांची गरीबी हटायला वेळ लागणार नाही. असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ गोविंद घार यांनी व्यक्त केले.