अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाची रौप्य महोत्सवाकडे गुणवत्तापूर्ण वाटचाल

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाची रौप्य महोत्सवाकडे गुणवत्तापूर्ण वाटचाल

उदगीर (लक्ष्मण उगिले) : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय ‘ या उदात्त ध्येयाने प्रेरित झालेल्या उदगीर येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाने १५ जून २००० रोजी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे महात्मा फुले वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली.

बघता बघता रौप्य महोत्सवाकडे या महाविद्यालयाने यशस्वी वाटचाल सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल प्रशासनामुळे या महाविद्यालयाने अल्पावधीतच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये आपला गुणवत्तापूर्ण आणि सर्वगुणसंपन्न विद्यार्थी विकासाचा आलेख उंचावला आहे. किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या डोळस मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयाची उत्तुंग भरारी घेऊन यशाकडे दमदार वाटचाल सुरू असून विद्यापीठामध्ये सातत्याने बी. ए. कला शाखेमध्ये प्रथम, द्वितीय तर कधी विविध विषयांमध्ये विद्यार्थी प्रथम येऊन ‘गुणवत्तेचा झेंडा’ या महाविद्यालयाने फडकवलेला आहे.

पहिले पूर्ण वेळ प्राचार्य म्हणून महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी दि. ३१ मे २००९ रोजी पदभार स्वीकारला. पहिली ते पदवीपर्यंत एकत्रितपणे गुणवत्तायुक्त दर्जेदार शिक्षण देणाऱ्या महात्मा फुले परिवारात प्राचार्य म्हणून डॉ. वसंत बिरादार पाटील यांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या दूरदृष्टीतून आणि कुशल प्रशासकीय अनुभवातून महात्मा फुले वरिष्ठ महाविद्यालयाच्या विकासात्मक वाटचालीस सुरुवात झाली. मराठी विषयाचे कुशल प्राध्यापक म्हणून नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयात त्यांनी १९ वर्ष एवढी प्रदीर्घ सेवा बजावलेली होती. शिवाय ‘लोकमत’ सारख्या महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाच्या आणि मोठ्या व्यापाच्या दैनिक वृत्तपत्रातील पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी होता. त्यांनी सुरुवातीला महाविद्यालयीन प्रशासन, कार्यालयीन कामकाज आणि संस्था, विद्यापीठ तसेच शासनाचे उच्च शिक्षण विषयक धोरण समजून घेतले. त्यानंतर महात्मा फुले वरिष्ठ महाविद्यालयाच्या विकासाचा आलेख प्रचंड वेगाने चढू लागला. आजही तो चढतोच आहे. बेंगळुरू येथील राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद ( नॅक) या संस्थेकडून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने आपले मूल्यांकन करून घेतले. त्यामध्ये महाविद्यालयास ‘बी’ हा दर्जा ‘ नॅक’ ने महात्मा फुले महाविद्यालयास बहाल केला. यातच प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांची आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची कार्य कुशलता सिद्ध झाली आहे. गेल्या २२ वर्षांपासून हे महाविद्यालय सातत्याने या परिसरातील गोरगरीब, वंचित समूहातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि बौद्धिक अशा सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवित आले आहे. यापैकी विस्तारभयास्तव जास्तीची माहिती न देता काही मोजक्या उपक्रमांचा उल्लेख याप्रसंगी करावासा वाटतो.

विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीतील सातत्य

महात्मा फुले महाविद्यालय हे सतत गत आठ वर्षांपासून विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत अग्रक्रमावर आहे. इ.स. २०१६ मध्ये तानाजी कांबळे हा विद्यार्थी विद्यापीठात सर्व प्रथम येऊन सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. याच बरोबर तो भूगोल विषयात सर्व प्रथम येऊन वेळापूरकर पुरस्काराचाही मानकरी ठरला.
इ.स.२०१७- १८ मध्ये संस्कृत विषयात दीपाली परतवाघ ही विद्यार्थिनी विद्यापीठात सर्वप्रथम आली. इ.स २०१८ -१९ मध्ये कैलास ससाणे हा विद्यार्थी विद्यापीठात सर्व प्रथम येऊन सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. शिवाय तो इंग्रजी या विषयात विद्यापीठात सर्व प्रथम येऊन सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.

इ.स. २०१९ -२० मध्ये हिंदी विषयात ज्ञानेश्वरी श्रीरामे, राज्यशास्त्र विषयामध्ये राजश्री गुट्टे,खुरेशी माजिद या विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रथम आल्यामुळे सुवर्ण पदक मिळाले.

इ.स. २०२०- २१ मध्ये पूजा चव्हाण ही विद्यार्थिनी विद्यापीठात सर्व प्रथम आली. शिवाय राज्यशास्त्र या विषयातही ती विद्यापीठात सर्व प्रथम आल्यामुळे तिला दोन‌ सुवर्ण पदक मिळाले. तसेच संस्कृत विषयात रेणुका मलकापुरे ही विद्यार्थिनी सर्व‌‌‌ प्रथम येऊन सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. अवघ्या २२ वर्षाचे हे महाविद्यालय पण पन्नास पन्नास वर्षांच्या महाविद्यालयांना गुणवत्ता असो की अन्य कोणतेही उपक्रम असो त्यात त्यांना कधीच मागे टाकले आहे.

केंद्र सरकारकडून महाविद्यालयाच्या दत्तक गावाचा गौरव

महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट सक्रिय आहे. या युनिटचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पी .डी. चिलगर यांचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडने उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून गौरव केला आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दत्तक घेतलेल्या मौजे उगिलेवाडी या गावातील चुली ह्या धूरमुक्त करून घरोघरी अहमदपूर येथील ओम गॅस एजन्सीचे मालक महेन्द्र खंडागळे व उगिलेवाडीचे सरपंच सौ.सुक्षा जंगापल्ले उपसरपंच सौ. उषाताई बेंबडे व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सहकार्याने इ.स. २०१५ मध्ये घरोघरी गॅसचे कनेक्शन दिले.

या कार्याची केंद्र सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाने दखल घेऊन उगिलेवाडीचा धूरमुक्त गाव म्हणून गौरव केला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने आमच्या महाविद्यालयाच्या उत्कृष्ट एनएसएस युनिटची दखल घेऊन, १०० विद्यार्थ्यांच्या युनिटला अतिरिक्त २५ विद्यार्थ्याची अतिरिक्त मान्यता शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून देण्यात आली आहे.

स्पर्धा परीक्षेतून कॉलेज आयडॉल

महाविद्यालयात शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे, विद्यार्थी ज्ञानपिपासू बनावा, तो सतत अवांतर वाचन करावा, जगातील स्पर्धेचे आव्हान पेलण्यासाठी तो सदैव तत्पर राहावा म्हणून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयात स्वतंत्र असे स्पर्धा परीक्षेचा विभाग अस्तित्वात आणून त्यासाठी‌ डॉ. बी. के. मोरे हे प्रमुख व सहाय्यक अशा एका प्राध्यापकांची नियुक्ती केली गेली आहे.

दरवर्षी हा स्पर्धा विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क आकारून राज्यातील मान्यवर आय. ए. एस.अधिका-यांसह इतरांना पाचारण करून यु.पी.एस.सी.व एम. पी. एस.सी परीक्षेची तयारी कशी करावी, त्यासाठीचे मार्गदर्शन केले जाते. महाविद्यालययात स्पर्धा परीक्षेची किमान चार हजारांहून अधिक पुस्तके आहेत. ही पुस्तके त्या त्या वर्षी नवीन एडिशनची खरेदी असते. ही खरेदी विद्यार्थ्यांकडून जी नाममात्र शुल्क आकारली गेलीली आहे त्यातून खरेदी केली जाते. तसेच आठवड्यातील तीन दिवस महाविद्यालयातील प्राध्यापक आप आपल्या विषयाच्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेचा कसून अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतात. वर्षाच्या शेवटी परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेचे पेपर्स बाहेरील तज्ज्ञ मान्यवरांकडून तपासून घेतले जाते. त्यातून जो विद्यार्थी सर्वाधिक गुण घेतलेला असेल त्याला कॉलेज आयडॉल विद्यार्थी म्हणून घोषित करून त्याचा मानपत्र देऊन यथोचित सन्मान केला जातो.

आदर्श शिक्षक पुरस्कार

महाविद्यालयातील प्राध्यापकांना आपल्या दैनंदिन शैक्षणिक कामकाजात उत्साह यावा, त्यांनी अधिक जोमाने विद्यार्थ्यांना शिकवावे यासाठी दरवर्षी महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने कर्तव्य परायण, डिव्होटेड, अशा निवडक प्राध्यापकांना इ.स.२०१५ पासून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतात. यातून प्राध्यापकांना आपले कार्य उत्साहाने पार पाडण्यासाठी प्रेरणा मिळते.

शिवजयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा महात्मा फुले महाविद्यालयासाठी मोठा सण असतो. महाराजांचे कार्यकर्तृत्व सतत स्मरणात राहावे म्हणून महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने दरवर्षी राज्य पातळीवरील निबंध लेखन स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाते. जाहीर कार्यक्रमात विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जातात.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार

लेखकांना प्रोत्साहन मिळावे तसेच मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे यासाठी महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने क्रांतीज्योती महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्कार दिले जातात.

अमृत महोत्सवी ग्रंथदान सोहळा

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयास लोकसहभागातून ७५०० ग्रंथ दान देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिराजदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. परिसरातील काही दानशूर ग्रंथ प्रेमी नागरिकांनी प्रत्येकी ७५ ग्रंथ देऊन या उपक्रमास हातभार लावला. लेखकन- वाचन चळवळीला बळ देणारा हा एक ऐतिहासिक सोहळा होता.

विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान

दरवर्षी ३ जानेवारी हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महात्मा फुले महाविद्यालयात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून साजरा केला जातो. समाजशास्त्र विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आगळे वेगळे आयोजन केले जाते. त्याचे कौतुक परिसरातील नागरिकांकडून होत आले आहे.

आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन

प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष लक्षात घेऊन महाविद्यालयातील सर्व विषयांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, चर्चासत्रे ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरित्या घेण्यात आल्या. या प्रत्येक कार्यशाळेचे, चर्चासत्राचे स्वतंत्र आयएसबीएन / आयएसएसएम क्रमांकांसह ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. त्यामुळे विविध लेखक, संशोधकांना, विद्यार्थ्यांना लिहिण्याची संधी मिळाली. ही फार मोठी उपलब्धी आहे.

फुले परिसर : हिरव्या वनराईचा परिसर

महात्मा फुले महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसरात प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या संकल्पनेतून विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे प्रचंड वनराई बहरली आहे. राष्ट्रीय सेवा योजना आणि महात्मा फुले महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक वर्गाकडून ‘जिजामाता वृक्ष उद्यान’ हा उपक्रम राबविला गेला आहे.

‘मिया-वाकी’ शहाजीराजे ऑक्सिजन पार्कची उभारणी

जिजाऊ वृक्ष उद्यानाच्या शेजारीच शहाजीराजे अक्सिजन पार्क अर्थात मियावाकी प्रकल्प उभारण्यात आला असून त्यामुळे महाविद्यालयाच्या नैसर्गिक सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. या प्रकल्पाला विविध मान्यवरांनी भेटी देऊन समाधान व्यक्त केले आहे.

विद्यार्थी दत्तक योजना

महाविद्यालयातला आर्थिक अडचणीमुळे एखादा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयात दरवर्षी विद्यार्थी दत्तक योजना राबविली जाते. दरवर्षी गोरगरीब वंचित समूहातील हुशार व गुणी विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांची संपूर्ण वर्षभराची फीस महाविद्यालयाच्या वतीने भरली जाते. आतापर्यंत या योजनेचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

प्लेसमेंट सेलची निर्मिती

महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी कोठे कोठे असतात. त्या कुठे कुठे आहेत, याचं मार्गदर्शन मिळण्यासाठी स्वतंत्रपणे प्लेसमेंट सेलची निर्मिती करण्यात आलेली आहे. या सेल द्वारे विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांच्या जागा, बॅंकिंग रिक्रूटमेंट, एल. आय. सी., सहकारी साखर कारखाना, पोलीस भरती, तलाठी, मिल्ट्री, कारकून, शिक्षकभरती आदी पदांच्या जागेसंबंधी सविस्तर माहिती दिली जाते.

हिंदुस्थान स्काऊट गाईडचे युनिट कार्यरत

महाविद्यालयात विद्यार्थ्याचे शारीरिक व मानसिक तसेच बौद्धिक मनोबल वाढून तो विद्यार्थी भारताचा सक्षम,सुदृढ व तितकाच जबाबदार नागरिक म्हणून तो विद्यार्थी महात्मा फुले महाविद्यालयातून बाहेर पडला पाहिजे ही खूणगाठ मनाशी बांधून व विद्यार्थी केंद्रबिंदू मानून डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी महाविद्यालयात केंद्र व मान्यताप्राप्त व राज्य सरकार पुरस्कृत हिंदुस्थान स्काऊट गाईडच्या १०० विद्यार्थ्यांचे युनिट मंजूर करून घेतले आहे.

महाविद्यालयात या हिंदुस्थान स्काऊट गाईड कडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या कवायती, परेड,शैक्षणिक पाठ व परीक्षा घेऊन प्रमाण पत्र दिले जातात. सदरील प्रमाण पत्र हे नोकरीच्या वेळी उपयुक्त ठरतात. या स्काऊट मध्ये सहभागी होणा-यांना नोकरीमध्ये १२ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

भित्तीपत्रकातून लेखक घडविणारे महाविद्यालय

महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्याबरोबर त्यांच्यातला लेखक, कवी जागा झाला पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी दर महिन्याला महाविद्यालयातील सर्व विषयांचे भित्तीपत्रके प्रकाशित केले जातात. शिवाय डॉ.अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब हे कवितेची, शुद्धलेखन, निबंधलेखन, कार्यशाळा आयोजित करतात. यामध्ये चालू घडामोडी सह विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मुक्त आविष्कारपीठ मिळते. दरवर्षी महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी कवी म्हणून बाहेर पडतात. विविध वाड्.मयीन मासिकातून, दिवाळी अंकांतून, वर्तमान पत्रातून लेखन करतात.

विद्यापीठात तलवारबाजी सुरू करण्याचा बहुमान

महात्मा फुले महाविद्यालाचा क्रीडा विभाग हा समृद्ध व संपन्न आहे. या महाविद्यालयामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात तलवारबाजी हा क्रीडा प्रकार सुरू झाला. त्यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांनी या क्रीडा प्रकाराचे महत्त्व ओळखून सर्व महाविद्यालयात हा क्रीडा प्रकार सुरू करण्याचे आदेश पारीत केले. याचे सर्व श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार व क्रीडा संचालक डॉ. अभिजीत मोरे यांना आहे. डॉ.मोरे यांना क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाविद्यालयात विद्यापीठ स्तरीय तसेच दरवर्षी आंतर महाविद्यालयीन विविध स्पर्धा, प्रशिक्षण कॅंपचे आयोजन केले जाते. दर वर्षी विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन करतात. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या टीमचे फुले महाविद्यालयाचे विद्यार्थी नेतृत्व करतात. क्रीडा संचालक डॉ.अभिजित मोरे यांनीही असंख्य वेळा विद्यापीठीय टीम घेऊन गेले आहेत. एकूणच महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी ( म्हणजेच २५ व्या) वर्षपूर्तीकडे होणारी वाटचाल ही गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी युवक महोत्सवात सहभाग, महाविद्यालययातील स्नेहसंमेलन, विविध वाड्.मयीन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. महात्मा फुले महाविद्यालय हे वर्षभर अध्यापनासह विविध उपक्रमांच्या रेलचेलसह सतत कार्यरत असते. त्याबरोबरच या परिसराचे आपण देणे लागतो हे लक्षात घेऊन या महाविद्यालयाने या परिसरातील जनसामान्यांच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे भक्कम पाठबळ आणि प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांची दूरदृष्टी यामुळे अल्पावधीतच महात्मा फुले महाविद्यालयाने आपला नावलौकिक वाढविला असून रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणारे हे महाविद्यालय लोकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.

About The Author