देऊळ संस्कृतीचे वास्तव मांडणारी साहित्यकृती म्हणजे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे – सुषमा बेलकुंदे
उदगीर (एल.पी.उगीले) : देवळे अगोदर ज्ञानप्रसाराची व प्रबोधनाची केंद्रेआणि माहिती व संपर्काचे ठिकाण होते. उदरनिर्वाहासाठी सर्वांचं एक आशास्थान व तसेच सामूहिक संरक्षणाची जबाबदारी देखिल होती. देऊळ निर्मिती मागचा हेतू आणि आजची स्वार्थी धंदेवाईक पद्धती त्यातून होणारे शोषण त्यामुळे मूळ धर्म विचार बाजूला पडत असून लोककल्याणाचा मूळ हेतू संपत असल्याचे सांगत भिक्षुक शाहीवर कोरडे ओढत देऊळ संस्कृतीचे वास्तव मांडणारी साहित्यकृती म्हणजे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे होय असे विचार सुषमा बेलकुंदे हिने व्यक्त केले.
प्रतिभा काशिनाथ मुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या २७६ व्या विशेष बालवाचक संवाद मध्ये महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे बी.ए. तृतीय वर्गात शिकणारी कुमारी सुषमा मीना काशिनाथ बेलकुंदे या विद्यार्थिनीने प्रबोधनकार ठाकरे लिखित व गंगाधर बनबरे संपादित देवळांचा धर्म, धर्मांची देवळे या साहित्यकृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाली की बहुजनांच्या पैशातून निर्माण झालेल्या देवळात बहुजनांच्या शिक्षण प्रबोधनाचा विषय बाजूला राहून दैववाद व गुलामीचा आलेख वाढत आहे. शिकलेली माणसे देखील अंधश्रद्धेपोटी मंदिरावर खर्च करत आहेत.देवस्थानाचे उत्पन्न शिक्षणासाठी खर्च झाले पाहिजे. नव पिढीला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी शिक्षणाची मंदिरे म्हणजे शाळा बांधल्या पाहिजेत याचा विचार करायला सांगणारी साहित्यकृती म्हणजे देवळांचा धर्म धर्मांची देवळे हीअसल्याचे विचार मांडले.
यावेळी झालेल्या चर्चेत धुमाळे तुकाराम व्यंकटराव. बिरादार आनंद नरसिंगराव. प्रदीप ढगे. उषाताई तोंडचीरकर ,अर्चना पैके आदींनी सहभाग घेतला. अनेकांनी देव आणि देऊळ या संदर्भाने आपापल्या मनातील शंका उपस्थित केल्या तर त्यांचे निरसन सुषमा बेलकुंदे हिने आपल्या शैलीतून केले. हा विशेष बालवाचक संवाद असल्याने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्यात आली. या वेळी कुमारी अवनी मनीषा वीरभद्र स्वामी या चिमुकलीने स्वागत गीत सादर केले. संवादकांचा परिचय कुमारी कांबळे अश्विनी हिने करून दिला. संचलन कु.अंकिता जयमाला प्रदीप ढगे हिने तर आभार कु. दिपाली हनुमंत म्हेत्रे हिने मानले.