महिलांचे हक्क आणि वास्तविक स्थिती : विद्यादेवी रामराव होनमाने

महिलांचे हक्क आणि वास्तविक स्थिती : विद्यादेवी रामराव होनमाने

8 मार्च हा दिवस जागतिक ‘महिला दिन’ म्हणुन भारतातच नव्हे तर संपुर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा करत महिलांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम घेतले जातात. प्रथमत: मी नारी शक्तीला महिला जागतिक दिनाच्या अनंत अनंत शुभेच्छा देते. ‘महिला दिन’ का साजरा केला जातो याचे नेमके कारण म्हणजे संपूर्ण अमेरीका आणि यूरोप सहित जवळ-जवळ जगभराच्या स्त्रीयांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष विषमतेचे हे ढळढळीत उदाहरण या अन्यायाविरुद्ध स्त्रीया आपआपल्या परिने संघर्ष करीत होत्या. 1890 मध्ये अमेरीकेत मतदानाच्या हक्कसंदर्भात “द नॅशनल सफ्रेजिस्ट असोसिएशन” स्थापन झाले. परंतु ही असोसिएशन सुद्धा वर्णव्देशी आणि स्थलांतरीता विषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना कृष्णवर्णीय मतदात्यापासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरीत मतदात्यापासून वाचविण्याकरीता स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळायलाच हवा. अशा प्रकारचे आव्हान ती करत होती. या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळ्या वर्णाच्या आणि देशांकरीता कामगार स्त्रीयांना जोरदार विरोध केला. आणि क्रांतीकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्काच्या मागणीला पाठिंबा दिला. 1907 साली स्टुटगार्ड येथे पहिली अंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद बनली. या परिषदेत क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी संघर्ष हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली. 8 मार्च 1908 रोजी न्युयॉर्क मध्ये वस्त्रोद्योगातील हजारो कामगारांनी रुटगर्स चौकात जमुन प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. 10 तासाचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. दोन मागण्याबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभुमि निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरदारपणे केली. अमेरीकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतिने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या अंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरीकेतील स्त्री कामगारांना केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणुन स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला तो पास झाला. या ठरावानंतर यूरोप अमेरीका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये व 1919 साली अमेरीकेत या मागण्यांना यश मिळाले. त्यानंतर पुढे जगभरात 8 मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा होवू लागला.

आपल्या देशात अलिकडच्या काळात महिलांचे गुण फार प्रकर्षाने जाणवायला लागले आहेत. 10 वी आणि 12 वी, इंजिनिअरिंग, मेडिकल सारख्या मोक्याच्या परीक्षांचे निकाल जाहिर होतात. तेव्हांतर मुलींच्या पास होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. समान परिस्थितीतील मुले शिक्षणही समान परंतु लिंगभेदामुळे इतके भिन्न असते की मुली घरकामात लक्ष घालुनही मुलांपेक्षा अधिक गुण मिळवितात हे सारे दिसत असुनही समाजातले पुरुष मुलींकडे किंवा महिलांकडे आदराने तर सोडूनच द्या पण समानतेच्या भावनेने सुद्धा बघायला तयार नाहीत. अजुनही मोठ्या प्रमाणावर स्त्रीकडे उपभोग्य वस्तु म्हणुन पाहिले जाते. प्राचीन काळी म्हटले जायचे – “यत्र नार्यस्तु पुजंते, रमंते तत्र देवत:” अर्थात ज्या घरात नारीची पुजा केली जाते त्या घरामध्ये देवतांचा वास असतो. जरी प्राचीन काळापासून नारी विषयी असे म्हटले जायचे परंतु आज आम्ही पाहतो खरच नारींची वरील उक्तीप्रमाणे पुजा केली जाते का? तिना मानाचे स्थान मिळते का? भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे दिला हक्क मिळतात का? असे कितीतरी प्रश्न निर्माण होतात… महिला खरोखरच स्वतंत्र भारतामाध्ये स्वतंत्र आहे का? जर दहा मिनिटे उशीर झाला तर तिला आपल्या स्वकीयांद्वारे अनेक प्रश्न विचारले जातात. इतके वेळ कोठे होतीस? इतका वेळ का लागला? परंतु पुरुषप्रधान या संस्कृतिमध्ये महिलांवर विश्वास ठेवला जात नाही. पुरुष तिच्या शंकेच्या नजरनेने पाहत असतो. भाऊ-बहिण जरी रस्त्याने गेले तरी अनेकांची वक्र दृष्टि त्यांच्यावर पडते आणि विविध प्रश्न विचारले जातात. मैथलिशरण गुप्त याबाबात म्हणतात कि, “अबला जीवन हाय तेरी यह कहानी… आँचल में है दुध और आँखो मे पानी” म्हणुन म्हणावेसे वाटते प्राचीन काळापासुन ते आजपर्यंत नारीचे जीवन हे बंधिस्त राहिलेले आहे. नारीचा जन्म झाल्यापासून ते मरे पर्यंत तिचा जन्म गुलामीत जातो. नारी ही लहान वयात आई-वडीलांच्या गुलामीत राहते. शहाणी झाल्यावर ती नवऱ्याच्या गुलामीत जगते आणि म्हातारपणी मुलांच्या गुलामीत जीवन जगत असते. स्वतंत्र भारतामध्ये महिलांना भारतीय संविधानाने अधिकार, हक्क दिले असले तरी त्याचा उपभोग महिलांना घेवू दिले जात नाही हे आजच्या समाजातील वास्तव आहे.

अनेक वर्षापासून समाजामध्ये कांही अनिष्ठ प्रथा, परंपरा चालत आल्या आहेत. एखाद्या मुलाचा एखाद्या मुलीशी विवाह होतो तेंव्हा आजवर रुढ असलेल्या पद्धतीनुसार मुलगी मुलाच्या घरी जाते. हा प्रवाह उलटा करण्याची हिम्मत अजुनतरी कोणत्याही देशात दाखविली गेली नाही. सगळ्या जगात सगळया जातीमध्ये आणि सगळ्या धर्मामध्ये मुलगी विवाहानंतर मुलाच्या घरी नांदायला जाते. हा व्यवहार म्हणून मान्य करुन परंतु आपल्या भाषेमध्ये या नातेसंबंधाविषयी बोलताना आमक्याची मुलगी तमक्याच्या मुलाला दिली. अशी भाषा वापरली जाते. तिच्यातुनच समाजाची माणसिकता प्रकट होते.

सध्या तर मुली मोठ्या प्रमाणावर शिकत आहेत आणि भारतात हळुहळु महात्मा फुले व सावित्रीमाई यांच्या कार्यामुळेच असे मला प्रकर्षाने सांगावेसे वाटते. निदान या पातळीवर तरी मुलीच्या जातीला शिकुन करायचेच काय? असा प्रश्न विचारण्याचे प्रमाण जवळ-जवळ नाहीतच जमा झाले आहे. परंतु या शिक्षणाच्या समान संधीचा अर्थ लोकांच्या मनात मुलीविषयी समानतेची भावना निर्माण झाली आहे. असा अर्थ काढु लागलो तर ती चुक ठरेल. आपल्या समाजामध्ये अस्पृश्यता रोटी-बेटी व्यवहार अशा रुढींचा त्याग केला आहे. परंतु त्यामागे सामाजिक जाणीव आहे असे म्हणता येत नाही. नाइलाज म्हणून निरुपाय म्हणून आणि आता गत्यंतर नाही म्हणून या रुढींचा आपण त्याग केलेला आहे. हीच गोष्ट मुलींच्या शिक्षणाला लागु आहे. मुलगा आणि मुलगी त्यांच्याकडे समानतेच्या भावनेतुन बघण्याची वृत्ती वाढली म्हणून मुली शाळेत जात आहेत असे नाही. तर शिकल्या शिवाय मुलींचे लग्न करु शकणार नाही. या निरुपायापोटीच मुलींना शाळेत पाठविले जात आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षण वाढत असले तरी मुलींकडे समानतेच्या भावनेने बघण्याची प्रवृत्ती वाढली आहे. असे काही नाही तेंव्हा समाजामध्ये मुलींकडे समानतेच्या भावनेची प्रवृत्ती वाढली गेली पाहिजे. जर असे झाले तर समाजाचा कायापालट होईल असे मला वाटते. महापुरुषांच्या कार्यामुळे आज मुलींचे शिक्षणाचे प्रमाणे वाढले आहे. आजची महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन प्रत्येकक्ष क्षेत्रात उत्तमरित्या कार्य करत आहेत. मी स्वत: महिला असल्यामुळे मला याचा सार्थ अभिमान आहे. भारतीय संविधानाप्रमाणे महिलांना पूर्णपणे अधिकार दिले आणि महिलांच्या कर्तबगारीला वाव दिला तर ती भ्रष्टाचार, चोरी, लुटमार, शिक्षण समस्या यासारख्या अनेक समस्यांचे निराकरण करुन देशाला समृद्ध बनवतील यात काही शंका नाही. म्हणून मला भारतातील महिलांना उद्देशुन म्हणावेसे वाटते, “भारत के बेटी बनेगी कामयाब… जमाना कहेगा क्या बात है…. हम कहेंगे हुजूर यह तो शुरुवात है.. आगे… आगे… देखो होता है क्या भारत की बेटी सारे विश्व में राज करेगी…”

विद्यादेवी रामराव होनमाने (टाळकुटे)
आनंद निवास,
लेक्चरर कॉलनी, अहमदपुर
मो. नं. 8830101061

About The Author