गूढ व निखळ जाणिवेच्या डोहातली कृष्णचंद्र ज्ञातेंची : ‘तू, मी आणि कविता’
उदगीरचे कवी कृष्णचंद्र ज्ञाते हे मराठी कवितेच्या क्षेत्रात कायम स्थिर व ‘कोरीव’ नाव. १९६०नंतर जी पिढी उदयास आली त्या पिढीमधील व १९८० च्या दशकात अवघ्या महाराष्ट्रात त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कवितेला प्रतिसाद देणारा असा अत्यंत मोजका पण संवेदनक्षम वाचकवर्ग कृष्णचंद्र ज्ञाते यांनी तयार केला होता. आणि त्या वाचक वर्गांनी त्यांच्यावर अमाप प्रेमही केले होते. कृष्णचंद्र ज्ञाते हे मराठवाड्यातले ‘ग्रेस’ होते. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘कोमलरिषभ’ मौज ने १९८३ मध्ये प्रकाशित केला. त्यास मराठी कवितेच्या संगीत कवीकृती म्हणून वाचक, समीक्षकांकडून जो प्रतिसाद मिळाला तसा प्रतिसाद आजपर्यंत कोणत्याही कवीच्या नशिबी आला नाही. त्यानंतर तब्बल २३वर्षानंतर त्यांचा दुसरा काव्यसंग्रह ‘तू ,मी आणि कविता’ हा दमदार काव्यसंग्रह आला खरा पण; नियतीच्या मनात काही वेगळेच होते ते म्हणजे या काव्यसंग्रहाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केल्यानंतर, प्राचार्य पदाची यशस्वी धुरा सांभाळून प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेले डॉ. कृष्णचंद्र ज्ञाते यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने एक अलौकिक प्रतिभेच्या व दमदार जीवनानुभव, सांगितिक अनुभवविश्वाला मराठी कविता पोरकी झाली. त्यांच्या निधनानंतर काव्यसंग्रहाचे उर्वरीत काम पूर्ण करून लातूरच्या मुक्तरंग प्रकाशनचे मालक व प्रकाशक महारूद्र मंगनाळे यांनी १५ऑगस्ट २००७ मध्ये ‘ तू ,मी आणि कविता’ हा काव्यसंग्रह वाचकांच्या हातात दिला.
डॉ. कृष्णचंद्र ज्ञाते यांच्या’तू ,मी आणि कविता’ मधील कवितेच्या अनुषंगाने मीमांसा करताना तिच्यातील आलेल्या दुर्बोधतेच्या मुळाशी एखादे सर्वसमावेक सूत्र सापडते काय ? याचा शोध घेण्याचा मोह होतो. त्यावेळी ही कविता जीवनानुभवातील वेगवेगळ्या टप्प्यावर स्फुरलेली कविता आणि कवीला अंतर्यामी सतत अस्वस्थ करणाऱ्या अनुभवाशी निगडित भावनांची उकल करण्यासाठी यातील ‘कविता’ ह्या घट्ट वीण बनून अनेकदा दुर्बोधही बनतांना दिसतात.
सर्वसाधारण वाचक मात्र या कवितेपासून दूर जातो.कविता म्हणजे खरे तर कवी-रसिक हृदयसंवाद असतो.परंतु सर्वसाधारण वाचकांच्या दृष्टीने हा संवादच येथेही होतो. ही कविता वाचल्यानंतर तिच्या गहन अभिव्यक्तीचे अनवट वळण पाहून वाचक काहीसा बिथरतो, भांबावतो, आणि परिणामत: कृष्णचंद्र ज्ञाते यांच्या कवितेपासून तो अगदी दूर अंतरावर उभा राहतो. ही कविता देऊ पाहत असलेल्या अनुभवाविषयी, तिच्या आस्वादाविषयी, अभिव्यक्तीविषयी प्रचंड सामर्थ्यवान आहे. यातील कवितेचे थर्मामीटर वेगळे आहे. त्यामुळे ही कविता ज्याला समजेल तो वाचक सुजाण असणारा आहे.
कृष्णचंद्र ज्ञातेंची ‘कविता’ ही रूढ, पारंपरिक कवितेशी घनिष्ट नाते प्रस्थापित झालेली आहे.ही कविता वाचताना आपण अनेकदा फुलून येतो. या कवितेशी आपला घनिष्ट संबंध येतो. तर कधी कधी कवीच्या भावानुभूतीमुळे आपण बिचकतो भांबावतो, बावचळतो आणि चिडतोही. कारण अनाकलनीय वाटणारी काव्यशैली ही अर्थाच्या पलिकडे जाते की, वाचक तिथपर्यंत जाऊ शकत नाही. कवितेभोवती असलेली दुर्बोधतेची मिठी थोडीदेखील सैल होत नाही. या दृष्टीने पुढील एकच कविता पाहू-
‘हे नाही ना सहन होत तुला
जा…
एक डाळिंबाची डहाळी घेऊन
ये
आणलिस…गाड तिथं
ती… मधोमध
झाक टोपली तीवर एक अन्
उघड थोड्या वेळानं ती
काय,कण्हेर उगवलीय?
खा ती भरपूर
आता तू डाळिंब झालीयेस ना
आता तू कण्हेर खात जा.’
( ‘कण्हेर’ पृष्ठ क्र.९)
असा तर्कातीत अनुभव ही कविता देते. सर्वसाधारण वाचकाला यातली खोली गाठता येणे शक्य नाही. तो गोंधळून जातो. कवितेचे बुद्धिनिष्ठ आकलन करण्यालाच आपण कळत न कळत नकार देतो. ही वरील कविता जितकी आकर्षक आहे तितकीच ती फसवी आहे. पण, ती तर्कातीत भावानुभव देते. सहन न होणा-यांना मग कोणता तरी दिलासा द्यायलाच हवा असतो याची अनुभूती येथे कृष्णचंद्र ज्ञाते अत्यंत गूढतेने देतात अन् तीही अप्रतिम !
‘तू , मी आणि कविता’ मधील काही कविता ह्या अत्यंत लहान आहेत.पण, अत्यंत तरल, आणि तेवढ्याच गूढ भावानुभवाच्या डोहातून समोरे जाण्याची क्षमता घेऊन त्या अवतरल्या आहेत. त्या सहज पेलता येण्यासारख्या आहेत. बहुधा तर त्या कविता ह्या कधी व्यक्तिनिष्ठ तर कधी समाजनिष्ठ आहेत. म्हणूनच की काय त्या काठिण्याची पातळी गाठतात.या दृष्टीने पुढील दोन कविता लक्षात घेता येतील-
१) ‘दु:ख पचवावे आपण असे
आपलेपणाचे.
सत्र थांबवून
कापाकापीचे
मूल आपुले
होऊ द्यावे दायीचे. (‘दु:ख आपलेपणाचे’,
पृष्ठ क्र.३१)
२) ‘ रक्ताची जात
शोधताना दिसतो आहे
माणूस.
ह्या माणसांना फुटावे
मुकेपण अन्
मुक्या जनावरांना जिभा
मग होऊ द्या आपल्या
रामायण संस्कृतीचे
पोस्टमार्टेम.’
(‘पोस्टमार्टेम’,पृष्ठ क्र.४६)
या वरील दोन्ही संदर्भातून एक तरल अनुभूतीचा गहन रचनाबंध ज्ञातेंची कविता अंगिकारते.तर सुबोध असणारी सुविचारवजा रचनाही आपल्या मनात घर करून जाते. मग त्यातून नातेसंबंध व्यक्त होतात तर केव्हा मनातल्या जखमा साकार होतात. त्या कशा ते पाहा-
१) ‘ फार जवळ येत चालला
आहे
पेटत पेटत वणवा
चोहोबाजूंनी माझ्या.
जळून जाणार आहे यात मी
याचे भय मुळीच नाही मला
डोळ्यांसमोर माझ्या
जळून जात आहे जे
ते कसे वाचवता येईल कसे
या विवंचनेत
मी उभा आहे ‘
( ‘विवंचना’,पृष्ठ क्र.३५)
२) ‘ह्या भयान राती
उशी
माझी
सखी’
(‘सखी’,पृष्ठ क्र.४५)
या रचनेत कुठेही दुर्बोध वळणे नाहीत. हे ही ज्ञातेंच्या कवितेचा दुसरा एक पैलू उलगडून दाखवता येईल.
कृष्णचंद्र ज्ञाते यांची ही वस्तुतः कविता निखळ जाणिवेच्या डोहातली कविता आहे. ती अतिशय नाजूक आहे. नाजूक या अर्थाने की ज्या भाषेत ती व्यक्त होते तिच्याशी दंगामस्ती केली तर ती एकसंघ अर्थ हाती येण्याऐवजी ओंजळीत निरर्थक फोलपटे गोळा होतात. म्हणून ज्ञातेंच्या कवितेतल्या संमोहन शब्दाची संमोहनशक्ती, त्यांचे अंत:संगीत, कवितेतील अनुभूतीच्या लयीला लगटून जाणारी नादानुवर्ती लय, घटकांची मांडणी, ही सारी कवितेची अस्त्रे कशी येतात 'माझा मी' या कवितेतून ते पाहता येईल. ते असे-
'नको तेव्हा सारा समुद्र
ओथंबलेला
माझ्या पापणीत
पापण्या जड जड...
गच्च- टप् टप्
ओघळणे चालूच-
एकानंतर एक...एक एक
लोलक.'
ही संपूर्ण कविता निखळ जाणिवेच्या पातळीवरून कशी आविष्कृत होते हे मुळातून पाहण्यासारखे आहे.
कृष्णचंद्र ज्ञाते यांचा पिंड हा काव्य, सहित्य आणि संगीताचा. त्यांच्या ‘कोमलरिषभ’ या काव्यसंग्रहात याची साक्ष पटतेय. असे असले तरीही याही काव्यसंग्रहात त्यांचे संगीतावर असलेल्या प्रेमाची साक्ष ‘राग:कलावती (ख्याल)’ ‘राग: मारूबिहाग’ या दोन कविता देतात. यातून विशुद्ध संगीताचा अनुभव आणि त्याला समकक्ष असा कवितेतील शब्दातून येणारा संगीतानुभव आपल्याला येथे घेता येतोय.
‘पध निसा ध प सा सा सा ध
नि ध प
पध निसारे निधम धम
‘पिया घर आss’
‘पिया घर आss’
गलितगात्र…संवेंद्रियांच्या
संज्ञा’
(‘राग:कलावती'( ख्याल),
पृष्ठ क्र.२२)
येथे शब्दांचा ‘शब्द’ म्हणून विचार करताना ते केवळ ‘नादावयव’ म्हणून त्याकडे ते बघत नाहीत तर ‘अर्थपूर्ण नादावयव’ म्हणूनच ते पाहतात. त्यामुळे निर्मितीच्या क्षणी कवी कृष्णचंद्र ज्ञाते जे पद्मबंध निर्माण करतात त्यात अर्थाच्या आकृतीलाही महत्त्व प्राप्त झालेले दिसते.
‘तू ,मी आणि कविता’ मधील प्रेमाचा अनुभव घेण्याची व तो मांडण्याची पृथगात्म शैली कशी आहे ते ‘मधुचंद्र’या कवितेतून लक्षात येते. ज्ञातेंची ही कविता व्यक्तिगत व सामाजिक दुःखाच्या प्रगल्भ पातळीची जाणीव करून देते. म्हणून ती एकसुरी आणि एकपदरी राहत नाही. तरीही ती व्यामिश्र व संकीर्ण बनत जाते. म्हणून ही कविता एक प्रकारचा ‘कबुलीजबाब’ बनते.’कन् फेशन’ बनते. या दृष्टीने-
‘ मी दररोज संध्याकाळी,
संबंध शेजच सजवितो
फुलांची
आज तू केसात गजरा
माळलास तशी
यावर तू म्हणशील,
‘कुठे ती’ मला ती शेज फुलांची
दिसलीच नाही कधी ?’
यावर मी म्हणेन,
बरोबर आहे, ती शेज फुलांची
कधी दिसलीच नसली
पाहिजे तुला.
नेहमीच असतो ना तुझ्या
गळ्याशी खेळत तो साप
सुगंधाचा.’
………..
अन् तोच साप दिसतो
माळलेला असा नेहमीच
तुझ्या वेणीत गजरा होऊन.’
( ‘गजरा आणि साप’, पृष्ठ
क्र.५१)
एवढेच नव्हे तर ‘साजरे करायचे असतात आपल्या भोगाचे एक एक मधुचंद्र’ ( पृष्ठ क्र.४७ ) तसेच-
‘अंधारली मने
उजळून निघावीत
दीस ओल्या वेळेस
माती गर्भार व्हावी,
(‘आनंदकळा’,पृष्ठ क्र. १२)
असाही संयतशील अनुभव ‘मधुचंद्र’ या कवितेतून साकार करतात.
कवी कृष्णचंद्र ज्ञाते यांच्या कवितेतून त्यांच्या अंतरबाह्य संघर्षाची आपल्याला प्रचिती येते.’ हे विधात्यांनो’ या कवितेत ते मूल्यांची होत असलेली अधोगती पाहून अस्वस्थ होतात.अगतिक होतात. त्यामुळे आपली खरी अडचण काय आहे ते नमूद करताना विधात्यांना म्हणतात की-
‘हे विधात्यांनो
आम्हाला जरा तुमचा आधार
हवा आहे
आम्हाला मरण येत नाही
ही आमची खरी अडचण
आहे
एवढी ही अडचण तुम्ही दूर
केलीत की
अमर होणार आहोत आम्ही’
(पृष्ठ क्र.३८)
‘ तू ,मी आणि कविता’ मधील कवितांमधून वाड्मयीन, सांस्कृतिक पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ जागोजागी अभिव्यक्तिला उठावदारपणा तर आणतातच आणतात पण, त्यामुळे कविता ही जिवंतरूप धारण करून बोलकी बनते.उदा.-
‘आपण हे मान्य करू की,
क्रुसाखाली निर्धास्तपणे
विसावलेले ते हृदय
आपलेचआहे,
पण,विसरतही आहोत
आपण की,
ह्या क्रुसावरच तर ठोकलेला
होता ख्रिस्त.
ह्या ख्रिस्ताच्या जखमेतूनच
ठिबकणा-या रक्तानेच तर
आपले हृदय स्पंदते आहे
अहोरात्र !’
( ‘संधिप्रकाश’, पृष्ठ क्र.४०)
या शिवाय, ‘कांचनाचे मायावी रूप’, (पृष्ठ,क्र. २६), ‘सिकंदरेआझम’ (पृष्ठ क्र.३४)’रामायण कालीन संस्कृतीचे स्पंदन’ (पृष्ठ क्र.४६), ‘जगतनिर्माता विश्वकर्मा’ (पृष्ठ क्र.५५) ‘वृंदावन’, (पृष्ठ क्र.५६) असे संदर्भ अनेक ठिकाणी आलेले आहेत.
या संग्रहात आलेले ‘शब्द’ आणि ‘अर्थ’ हे गणिती पद्धतीने आलेले आहेत. या कवितांमधील कवीची जी अनुभूती आहे त्याला योग्य आकार देण्यासाठी ते येतात. अनेकदा नित्याच्या व्यवहारात शब्द बोथट होतात म्हणून आपली भावस्पंदने व्यक्त करतांना कृष्णचंद्र ज्ञातेंची ही कविता प्रतिभेच्या कल्लोळात मनोसोक्त विहार करते. ती अशी-
‘ काय
इमारत
उभी करायची म्हणता
कबरीचेच दगड आणखी
जमवायचे आहेत
नाहीच पडला तोटा त्यांचा
तर समजू आमच्या नशिबी
एक नालच सही.
बाकीचे तीन नाल
अन् घोडा एक
तुमच्या खाती जमा करू
म्हणता
काय रा ss व
कसली इमारत
कसलं घोडं
व्हा बघू म्होरं…’
( ‘इमारत’, पृष्ठ क्र.४८)
अशी ही कविता प्रतिमारूप धारण करीत करीतच प्रतीकरूप धारण करते. या दृष्टीने पुढील काही नोंदी देता येतील.
‘अंधारली मने, उजळून निघावीत, दीस ओल्या वेळेस’, ‘माती गर्भार व्हावी’ (पृष्ठ क्र.१२),’आजही स्फुलिंग झडताहेत माझ्या धमन्याधमन्यातून स्वाभिमानाचे’ (पृष्ठ क्र.२०),
‘त्यातले बारूदही आता उडून जात आहे कापूर उडून गेल्यासारखे’ (पृष्ठ. क्र.३०), ‘उद्याचा गर्भपात निर्घृण दरवेळा’,(पृष्ठ क्र. ३९), ‘आपणच चघळीत आहोत देह आपला क्रुसाला साक्षी ठेवून’ (पृष्ठ क्र. ४०), ‘पात्यावरचे जहरी तेज माखून आपल्याच डोळ्यात काजळासारखे’ (पृष्ठ क्र.४१), तसेच ही कविता जशी कवितारूप धारण करते तशीच ती श्रेष्ठ दर्जाचे ललितरूपही धारण करते. त्या दृष्टिकोनातून ‘वाट अनवट’ ही कविता उत्तम उदाहरण आहे. निवेदन काव्यात्म असले तरी मोठे कथात्म घाटाचे व लालित्यपूर्ण, लाघवी आलेले आहे. तसेच या संग्रहातील इतर सर्व कविता ह्या तोलामोलाच्या उतरलेल्या आहेत.
‘तू ,मी आणि कविता’ मधील ‘बकरा कुर्बानीचा’ ‘पाकोळीसा’ ‘नखलून ‘, ‘सैतानी कदम’, ‘रेशीम ठेका’, ‘पोपड्यावर’,’हृदयात गिरमिट’,’अग्निप्रतिमा काळवंडून गेलेली’, ‘ऐन धुंदीत बदसूर’, ‘कबरीचे दगड’ ,’इत्यादी शब्दकळा लक्षणीय आहेत.
एकंदरीत ‘तू ,मी आणि कविता’ मधील कवितांचे अंतरंग हे कवीला आलेल्या’ गूढ’ अनुभवाच्या खोल खोल डोहातून आविष्कृत होणा-या आहेत. म्हणून कृष्णचंद्र ज्ञाते हे मराठवाड्याचे ‘ग्रेस’ आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांची कविता ही अनुभव घेतल्यानंतर ‘कविता कशी पचवावी लागते…’ हेच शिकवते. या कविता वाचतांना हेच जागोजागी जाणवते. एवढेच नव्हे तर कवी कृष्णचंद्र ज्ञाते हे अभिजात कवी असल्याने गूढ संवेदनांनाही कसे आवाहन करावे, ते त्यांना उपजतच अवगत होते हेही स्पष्टपणे जाणवते.ही कविता शीर्षकाच्या नामाभिधानाला सार्थ असे यात शंका नाही.
– प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
महात्मा फुले महाविद्यालय,
अहमदपूर,ता.अहमदपूर
जि.लातूर भ्रमणध्वनी ९८६०१६७९१२
‘तू ,मी आणि कविता’
(काव्यसंग्रह)
कवी- कृष्णचंद्र ज्ञाते
मुक्तरंग प्रकाशन, लातूर
आवृत्ती पहिली-
१५ऑगस्ट २००७
मुखपृष्ठ- वैजनाथ कोरे
पृष्ठे-५६
मूल्य-५०₹