मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी वृक्ष खूप महत्वाचे
वृक्षांना मानवाच्या जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे. माणसांच्या मूलभूत गरजा पुरवणारं निसर्गाचं देणं म्हणजेच वृक्ष. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवता आल्या की मानवाचे जीवन सार्थक झाले असे नाही. खरे तर माझ्या मते याच गरजांमध्ये प्राणवायूची गरज समाविष्ट करायला पाहिजे. या मुख्य चार गरजा भागविण्यासाठी आपल्याला विविध वनस्पतींचीच गरज पडते. वनस्पतींची पाने, फळे, फुले, तोर, बिया, मुळे, लाकूड, छाया असे सर्वच आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक असते.
वृक्ष स्वतः फळे खात नाहीत. ही परोपकाराची भावना आपण निसर्गाकडूनच शिकलो आहोत. निसर्गातील वृक्षा पासून मिळणाऱ्या सर्व 100% गोष्टींचा वापर मानव करीत असतो. म्हणून मला असे म्हणावे वाटते की मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी वृक्षांचे खूप महत्व आहे.
परंतु आज परिस्थिती आपणास उलटच पाहवयास मिळते आहे. घर बांधकामासाठी, घर व दुकानांच्या फर्निचरसाठी, कारखान्यासाठी, नवीन रस्त्यासाठी, रस्ता रुंदीकरणाच्या निमित्ताने आज झाडांची खूप मोठया प्रमाणात कत्तल केली जात आहे. बेसुमार वृक्ष तोडीमुळे तापमानात वाढ झाल्यामुळे दुष्काळाच्या झळा बसत असून माणूस अजूनही जागा झाला नाही. ही परिस्थिती बदलली नाही तर महाभयंकर दुष्काळाला भविष्यात सामोरे जावे लागेल. पर्यावरण संरक्षणासाठी प्रबोधनाची आज नितांत गरज आहे. जंगलतोडीमुळे मानवाची खूप मोठी हानी झालेली आहे. जंगलाचा नाश झाल्याने अनेक वनौषधी नामशेष झाल्या आहेत. तसेच जंगलातील पशु-पक्षी असंख्य जिवाणू-प्राण्यांचे आश्रमस्थान नष्ट झाले आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीत संचार वाढू लागल्याचे जागोजागी दिसून येत आहे. वृक्षतोडीमुळे पावसाळ्यात अनेक दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. आणि यामुळे जीवित हाणीसुद्धा झालेली आपणास पाहावयास मिळते. उदा. माळीण गाव. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होते. अनियमित पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसून हातात आलेले पीक वाया जात असलेले आपल्याला दिसून येते. वरील सर्व दुष्परिणामावर रामबाण उपाय म्हणजे वृक्षतोड थांबवणे आणि जंगलाची वाढ करणे.
झाडे हवेतील कार्बनडायऑक्साईड शोषून घेतात आणि प्राणवायु हवेत सोडतात. अनेक झाडे ओझोनचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. दुर्मिळ प्राणी, वनौषधी वनस्पती यांचे जतन जंगलांमुळेच होत असते. घनदाट जंगलांमुळेच हवेतील बाष्प शोषून घेतल्याने त्यातील थंडावा राखला जातो. पावसाची तीव्रता जंगल भागात अधिक असते. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते आणि भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात वाढ होते. खोलवर रुजलेल्या मुळाच्या सहाय्याने जमिनीची धूप थांबवली जाते. तसेच जमिनीची सुपीकता कयम राहते. झाडे प्राणवायूचे (ऑक्सिजन) उत्पादन करतात. त्यामुळेच आज पृथ्वीवर मानवासह वन्य जीव जीवित आहेत. वृक्ष हवेचे प्रदूषण थांबवतात. भूमीची धूप थांबवतात. भूगर्भतील पाण्याची पातळी वाढवितात आणि हवेतील आर्द्रता टिकवून ठेवतात. पशुपक्षी यांचे आश्रयस्थान हे वृक्ष आहेत. निस्वार्थ भावनेने वृक्ष सर्वांच्याच मदतीला उपयोगी पडतात. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी वृक्ष खूप महत्त्वाचे आहेत.
म्हणूनच या वृक्ष दिनाच्या निमित्ताने येणाऱ्या पावसाळ्यात जागा उपलब्ध असेल तेथे झाड लावून त्याचे संगोपन करणे आणि त्याला वाढविणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. झाडाप्रमाणेच निस्वार्थ भावनेने सर्व मानवांनी या कोरोनामय काळात जगायला शिकलं पाहिजे. ऑक्सिजन सोडणाऱ्या झाडांच्या सानिध्यात नियमित राहून आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे. घराच्या आजूबाजूला तुळस या वनस्पतींचे रोपटे लावले पाहिजेत. तुळस ही वनस्पती दिवसात 20 तास हवेत शुद्ध ऑक्सिजन सोडते. त्यासाठी शुद्ध प्राणवायूची सर्वांनाच आवश्यकता आहे आणि तुळस या वनस्पतीपासून ते आपणास सहजच मिळू शकते. आजच्या या कोरोनाच्या काळात आरोग्य चांगले ठेवणं हे सर्वांसमोर एक मोठं आव्हानच आहे. आरोग्य हीच धनसंपदा. त्यासाठी झाडे लावा झाडे जगवा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…!
नादरगे चंद्रदीप बालाजी
मो. 8605776478