दंगलीचे शहर ही ओळख पुसून सांस्कृतिक शहर अशी ओळख बनवा – पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे

दंगलीचे शहर ही ओळख पुसून सांस्कृतिक शहर अशी ओळख बनवा - पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे

 उदगीर/ (एल पी उगीले)
 उदगीर शहर म्हटले की, दंगलीचे शहर किंवा संवेदनशील शहर या नावाने ओळखले जाते, किंवा सीमावर्ती भागातील शहर म्हणून ओळखले जाते. ही ओळख पुसून आता सुसंस्कृत शहर ही ओळख बनवावी. त्यासाठी सुज्ञ नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन कायदा-सुव्यवस्था आणि शासनाचे नियम तंतोतंत पाळावेत. असे आवाहन लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले.
 ते उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. रहदारीची समस्या गंभीर असून अरुंद रस्ते त्यातही अनेक अडचणी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी स्वतःहून रहदारीच्या नियमाचे पालन करावे. जेणेकरून प्रत्येक ठिकाणी पोलिसांना थांबून नागरिकांना राखायची वेळ येऊ नये. रहदारीचा प्रश्न फक्त पोलिस प्रशासनाशी निगडीत नाही. त्याच्या सोबत इतरही अनेक विभाग कार्यरत असतात. जसे की, रस्त्याच्या कडेला पिवळा पट्टा मारून त्याच्या पलीकडे पार्क करावीत अशा पद्धतीच्या सूचना केल्यानंतर पोलीस यंत्रणा तशा वाहनावर कारवाई करू शकेल. तसेच रस्ते सुस्थितीत असणे आणि शहराच्या इतर भौतिक सुविधा उपलब्ध असणे या गोष्टी महत्वाच्या आणि आवश्यक आहेत. रहदारीला अडथळा आणणारे अवजड वाहने शहरात येऊ नयेत, तसेच ट्रॅव्हल्स,जीप यांचे थांबे शहराबाहेर असावेत. यादृष्टीने नियोजन केले जात आहे.


 रस्त्याच्या कडेला थांबणारे हातगाडीवाले, ठेले, भाजी विक्रेते हे एकाच ठिकाणी आपल्या गाड्या थांबून  राहिली तर रहदारीला अडथळा येतो. या दृष्टीने पोलिस यंत्रणा काम करेल, त्यादृष्टीने नगरपालिका प्रशासनालाही पत्र देऊन नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाला विशेषाधिकार असतात. त्यांनी आपल्या अधिकारातून कारवाई करावी. त्यासाठी पोलिस प्रशासनाचे सहकार्य सतत राहणार आहे. शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते फोडलेले आहेत. ते पूर्ववत दुरुस्त करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आपण नगरपालिका प्रशासनाला पत्र देऊन विनंती करणार आहोत, पोलीस प्रशासनाचे अधिकार मर्यादित आहेत. त्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांच्याकडून पोलिस प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातला अध्यादेश काढण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत, अशीही माहिती निखिल पिंगळे यांनी दिली. नागरिकांना राखण्यासाठी पोलीस यंत्रणा ही संकल्पना आता बदलायला हवी, प्रत्येक ठिकाणी पोलिस थांबून वाहतूक सुरळीत करेल ही अपेक्षा चुकीचे आहे .आपण सूज्ञ नागरिक आहोत. याची जाणीव प्रत्येकाने ठेवल्यास रहदारीचा प्रश्नच निर्माण होणार नाही. ज्या पद्धतीने प्रगतशील आणि प्रगत देशांमध्ये वाहतूक यंत्रणा पोलीस यंत्रणेत शिवाय चालत असते तशी आपल्याकडे का चालू नये ?याचे आत्मपरीक्षण प्रत्येकाने करावे. शहरातून जाणारा मुख्य रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. या रस्त्याची अनेक ठिकाणी तोडफोड झालेली आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो आहे. हे सर्व थांबून नागरिकांना रस्त्याने सहज आणि सोप्या पद्धतीने जाता येईल. या दृष्टीने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ इत्यादी विभागांच्या संवादातून आणि सहकार्याने प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. तसेच ऑटोरिक्षा मध्ये लावले जाणारे टेप तसेच मध्यभागी लावलेला आरसा या संदर्भात लवकरच कारवाईचे आदेश दिले जातील या दृष्टीने प्रयत्न केले जातील. तसेच नगरपालिकेमध्ये बांधकाम करत असताना त्या बांधकामां समोर पार्किंगची सोय असणे गरजेचे आहे. या दृष्टीने ही कारवाई केली जावी, म्हणून आपण या नागरिकांनी प्रयत्न करावेत. असेही आवाहन केले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारे अवजड वाहने कोणत्या मार्गाने एकेरी वाहतूक करता येईल या संदर्भात ही लवकरच नियोजन केले जाईल. अशी माहिती दिली. तसेच एक महिन्यात हा प्रश्न काही अंशी तरी निकाली निघेल असा विश्‍वास व्यक्त केला. 
यासोबतच धोरणाच्या बाबतीत नागरिकांनी नवीन नियमावली आली आहे. त्याप्रमाणे वागावे ,मास्क बंधनकारक आहेत. आपला उत्साह इतरांच्या आरोग्याला हानीकारक होऊ नये. या दृष्टीने गर्दी टाळावी, अन्यथा पुन्हा दंडात्मक कारवाई सुरू करावी लागेल. असा इशाराही त्यांनी याप्रसंगी दिलाआहे.

About The Author