अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी माधवराव म्हाडीवाले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोणाळी या ठिकाणी अनुभव शिक्षा केंद्र लातूरच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाषण व निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य संजय मंडोळे व प्रमुख पाहुणे म्हणून महादेव कोटे, प्रमुख उपस्थिती अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा कार्यवाहक ईश्वर पाटील, जिल्हा संघटक महेश काळे, तालुका संघटक विक्रम गायकवाड व सागर शिंदे, विद्यालयाचे प्रा. इंगळे, प्रा.हनुमंते, प्रा. बबन बिरादार हे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सावित्रीबाईंचे विचार आणि त्यांचा संघर्ष आपल्या भाषणातून चिमुकल्यांनी सांगितला. भाषणाची स्पर्धा असल्यामुळे एकापेक्षा एक विद्यार्थी आपल्या वाणीतून सुंदर भाषनातून आपले विचार मांडत होते. यानंतर महेश काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये अनुभव शिक्षा केंद्राची ओळख व माहिती करून दिले व तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महादेव कोटे यांनी बोलताना असे म्हणाले की, आजच्या युवा पिढीला थोर समाज सुधारकांचे विचार अंगीकारले पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या सावित्रीबाईंची आपण जयंती करतोय, त्या सावित्रीबाईच्या संघर्ष पाहिला तर खऱ्या अर्थाने त्यांनी पाजलेले हे शिक्षणाचे बाळकडू किती महत्त्वाचा आहे. हे लक्षात येईल, कारण मुलींना शिक्षण देणे म्हणजे पाप आहे, असे म्हणणाऱ्या कर्मकांडी लोकांना सामोरे जाऊन ही प्रथा मोडीत काढून, ज्यांनी सती प्रथा, बालविवाह अशा अनेक गोष्टीला आळा घालण्यासाठी शेणांचे शिंतोडे झेलले. अशा सावित्रीबाईंचे विचार आजच्या युवा पिढीला देणे गरजेचे आहे. ही जयंती साजरी करण्याचा मागचा उद्देश म्हणजे येणाऱ्या पिढीला सावित्रीबाईंचे संघर्ष लक्षात आणून देणे काळाची गरज आहे. पूर्वी स्त्री ही दुय्यम दर्जाची मानली जात होती, जी की स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. खऱ्या अर्थाने संधीची समानता ही पुरुषांना मिळते तेवढी स्त्रियांना पण मिळायला पाहिजे. संपत्तीचा असेल अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा असेल हक्क आणि अधिकार असे अनेक गोष्टी आज पण स्त्रियांना संघर्ष करावे लागतात. हे संघर्ष करण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त सावित्रीबाईंचे विचार करू शकतात. म्हणून आजच्या युवतींनी आपल्या अधिकारांच्या बळावरती आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सक्षम भूमिका घेणे गरजेचे आहे. खरे पाहता आपली येणारी पिढी हे सावित्रीबाईंचे विचार पुढे घेऊन चालणारी पिढी निर्माण झाली पाहिजे. असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यानंतर विद्यार्थ्यांना समतेच्या वाटेने हे चळवळीचे गीत घेऊन त्यांच्यासोबत खेळाच्या माध्यमातून हितगुज करण्यात आले. खूप उत्साहाने व आनंदाने या सर्व उपक्रमात सहभाग नोंदवला.. अशाप्रकारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
